न्यूयॉर्क - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ग्लोबल गोलकीपर पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. जगप्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांच्या हस्ते मोदींना गौरवण्यात आलं. स्वच्छतेसाठी घेतलेले निर्णय आणि राबवलेल्या योजना यासाठी मोदींना हा पुरस्कार देण्यात आला. बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या वतीने मोदींना ग्लोबल गोलकीपर पुरस्कार प्रदान करण्यात आला. याचवेळी पायल जांगीड या भारतीय तरुणीचाही चेंजमेकर पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
राजस्थानमधील बालमजुरी आणि बालविवाहासारख्या अनिष्ट परंपरा रोखण्यात पायलचा मोलाचा वाटा आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपसचिव अमिना मोहम्मद यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बरोबरीने ‘गोलकीपर्स ग्लोबल गोल्स अवॉर्ड’मध्ये सन्मानित झाल्याचा खूप जास्त आनंद आहे. ज्या पद्धतीने मी माझ्या गावात बालमजुरी आणि बालविवाहासारखे प्रकार थांबवण्यासाठी प्रयत्न केले तसेच काम मी जागतिक पातळीवरही करू इच्छिते' अशा भावना पायल जांगीडने व्यक्त केल्या आहेत.
सामाजिक कार्यकर्ते आणि नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी पायलचं भरभरून कौतुक केलं आहे. तसेच पायलने आमची मान अभिमानानाने उंचावली आहे. बालमजुरी आणि बालविवाहासारख्या अनिष्ट परंपरा रोखण्यासाठी पायल प्रयत्न करत आहे. तसेच तिने स्वत: बालविवाह करण्यास नकार देण्याचं धाडस दाखवलं. गाव आणि आसपासच्या परिसरात बालविवाहाविरोधात आवाज उठवला असल्याचं कैलाश सत्यार्थी यांनी म्हटलं आहे.
पायल ही राजस्थानची रहिवासी आहे. राजस्थानमधील ग्रामीण भागांमध्ये बालविवाह आणि बालमजुरी केली जात होती. पायलने याविरोधात आवाज उठवला. पालयचं कुटुंबीय तिचा बालविवाह करू इच्छित होते. मात्र तिने बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांना विरोध करण्याचं धाडस दाखवलं. तसेच आजूबाजूच्या गावात जाऊन बालविवाहाचा विरोध केला. पायलने गावातील लहान मुलं आणि स्त्रियांना सक्षम बनवण्यासाठी बरेच उपक्रम राबवले आहेत. राजस्थानमधील बालमजुरी आणि बालविवाहासारख्या अनिष्ट परंपरा रोखण्यात पायलचा मोलाचा वाटा आहे.
पंतप्रधान मोदींचा ग्लोबल गोलकीपर पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. ग्लोबल गोलकीपर पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर मोदींनी उपस्थितांना संबोधित केलं. हा माझा एकट्याचा सन्मान नसून कोट्यवधी भारतीयांचा सन्मान असल्याचे मोदी म्हणाले. कोट्यवधी भारतीयांनी स्वच्छ भारताचं स्वप्न पूर्ण केले. त्यासाठी स्वच्छतेला आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाचे स्थान दिले, अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या. महात्मा गांधींनी स्वच्छतेचे स्वप्न पाहिले होते. ते आता पूर्ण होत आहे. एखादे गाव स्वच्छ होईल, तेव्हाच त्या गावाला आदर्श म्हणता येईल, असे महात्मा गांधी म्हणाले होते. मात्र आता आम्ही एक गाव नव्हे, तर संपूर्ण देशच स्वच्छ करण्याकडे वाटचाल करत आहोत, असे मोदींनी म्हटले आहे.