PM Modi Ukrain President Volodymyr Zelensky, G-7 Summit: पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची शनिवारी जपानमधील हिरोशिमा येथे भेट झाली. दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये या भेटी दरम्यान काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चाही झाली. या भेटीचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना ही बैठक झाली, त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
याआधीही पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात अनेकदा फोनवरून चर्चा झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धादरम्यान समोरासमोर भेट आणि संभाषण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीत युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी मोदी म्हणाले, "युक्रेन युद्ध हा जगातील मोठा मुद्दा आहे. मी याला केवळ राजकारण किंवा अर्थव्यवस्थेचा मुद्दा मानत नाही, माझ्यासाठी हा मानवतेचा मुद्दा आहे. युद्ध सोडवण्यासाठी भारत आणि मी जे काही करू शकतो ते सर्व प्रयत्न करू."
G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ मे रोजी हिरोशिमा, जपानला पोहोचले आहेत. तत्पूर्वी, त्यांनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्याशी जपान आणि भारताच्या G-7 आणि G20 च्या अध्यक्षतेखालील अनेक जागतिक आव्हानांवर चर्चा केली. शनिवारी त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले. पंतप्रधानांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचीही भेट घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, जी-७ च्या शिखर परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन सहभागी झाले. एका सत्रात पंतप्रधान मोदी देखील बायडेन याच्यांसोबत सहभागी झाले होते. यावेळी जो बायडन स्वतःहून पंतप्रधान मोदी यांच्या आसनापाशी आले. पंतप्रधान मोदींची त्यांनी गळाभेट घेतली. यावेळी दोन्ही प्रमुखांची गळाभेट झाली. अवघ्या काही सेकंदांची ही भेट होती. मात्र, जो बायडन यांनी स्वतःहून येऊन पंतप्रधान मोदींची भेट घेणे हा विषय चर्चेचा ठरल्याचे सांगितले जात आहे.