जनकपूर- भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांमध्ये एकत्रित रामायण सर्किट तयार करु आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये जनकपूर येथे बोलताना दिले. पंतप्रधानांनी नेपाळमधील जनकपूर ते भारतातील अयोध्या यांना जोडणाऱ्या बससेवेला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचे उद्घाटनही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर आहेत. सकाळी 10.15 वाजल्यापासून त्यांच्या नेपाळ दौऱ्याचा प्रारंभ झाला. या दौऱ्यात सर्वात प्रथम ते जनकपूर येथे गेले असून जानकी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहाण्यासाठी जनकपूरवासियांनी मोठी गर्दी केली होती.
दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी काठमांडू येथे जाणार असून तेथए नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची ते भेट घेणार आहेत तसेच ते उपराष्ट्रपती नंदा बहादूर पन यांचीही भेट घेतील. त्यानंतर संध्याकाळी नेपाळचे पंतप्रधान के. पी ओली यांच्याबरोबर शिष्टमंडळासह विविध विषयांवर चर्चा करतील. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान अनेक करारांवर स्वाक्षरी करतील अशी माहिती देण्यात येत आहे. तसेच 6000 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेल्या अरुण 3 प्रकल्पाचे ते उद्घाटन करतीलय या प्रकल्पातून 900 मेगावॅट इतकी ऊर्जा निर्माण होणार आहे.