पॅरिस : फ्रान्सचा दोन दिवसांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी संयुक्त अरब अमिरातीला (UAE) रवाना झाले. दरम्यान, नरेंद्र मोदींनी आपला फ्रान्स दौरा 'संस्मरणीय' असल्याचे सांगितले. तसेच, फ्रान्सच्या बॅस्टिल डे सोहळ्यात सहभागी झाल्यामुळे तो अधिक खास झाला, असे म्हणत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि येथील लोकांचे नरेंद्र मोदींनी आभार मानले.
दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर असलेले नरेंद्र मोदी शुक्रवारी बॅस्टिल डे सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून नरेंद्र मोदी बॅस्टिल डे परेडला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते. यादरम्यान त्यांनी शुक्रवारी 14 जुलै रोजी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबतच्या संवादक परिषदेला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत आणि फ्रान्स दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एकत्र आहेत. तसेच, या दौऱ्यादरम्यान भारत आणि फ्रान्स यांच्यातील विविध करारांवर चर्चा झाली.
याचबरोबर, नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी व्यावसायिक सहकार्यामध्ये विविधता आणण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी विविध कंपन्यांच्या सीईओंची देखील भेट घेतली. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर नरेंद्र मोदी म्हणाले, "माझे मित्र राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी खूप फलदायी चर्चा झाली. आम्ही संपूर्ण भारत-फ्रान्सच्या संपूर्ण संबंधांचा आढावा घेतला. ग्रीन हायड्रोजन, अक्षय ऊर्जा, एआय, सेमीकंडक्टर आणि इतर यांसारख्या भविष्यातील क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याबद्दल मी विशेषतः उत्साहित आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यानंतर संयुक्त अरब अमिराती (UAE) साठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यात नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, भारत आणि संयुक्त अरब अमिराती फिनटेक, संरक्षण, सुरक्षा आणि ऊर्जा यासह विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच, संयुक्त अरब अमिराती या वर्षाच्या अखेरीस UNFCCC (COP-28) ची 28 वी परिषद आयोजित करणार आहे.