PM Modi in G7 Summit: जगातील सात श्रीमंत देशांची सर्वात मोठी G7 परिषद इटलीच्या अपुलिया शहरात झाली. पंतप्रधान मोदी इटलीहून भारतात परतले. गेल्या दोन दिवसांत G7 व्यासपीठावर जागतिक स्तरावरील नेतेमंडळींचे विविध कंगोरे पाहायला मिळाले. या सात देशांचा जगाच्या जीडीपीमध्ये ४० टक्के वाटा आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुत्सद्देगिरीचा प्रभाव जगातील नेतेमंडळींवर दिसून आला. जपान, फ्रान्स, इटली, जर्मनी, ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडा हे सात देश G7 आघाडीवर आहेत. भारत या सात देशांमध्ये नाही, तरीही मोदींच्या प्रभावाचा परिणाम म्हणूनच त्यांना केंद्रस्थानी ठेवून एक फोटो काढण्यात आला. त्याचा जागतिक पटलावर खूप मोठा अर्थ निघतो, असे सांगितले जात आहे.
G-7 शिखर परिषदेतील एका फोटोत मोदी मध्य भागी उभे असलेले दिसले. हा फोटो जागतिक मुत्सद्देगिरीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या चित्राच्या मध्यभागी पंतप्रधान मोदी आहेत. डावीकडे जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ स्कोल्झ आणि उजवीकडे जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, तर खालच्या रांगेत एका बाजूला मेलोनी आणि दुसऱ्या बाजूला ख्रिश्चन धर्मगुरू पोप उभे आहेत. या फोटोत अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन केंद्रापासून दूर आहेत. मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने पाहिल्यास, भविष्यातील योजनेच्या केंद्रस्थानी भारत असणार आहे, असा संकेत दिला जात आहे.
दरम्यान, इटलीतील अपुलिया येथे पंतप्रधान मोदी जागतिक नेत्यांमध्ये केंद्रस्थानी दिसले. भारत आणि इटली यांच्यातील राजकीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ही बाब आनंददायी वाटली. मोदींच्या गाठीभेटी बरंच काही दाखवून देत होत्या. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांशी मोदी भेटले. मंचावर पंतप्रधान मोदींनी पोप यांची गळाभेट घेतली. मॅक्रॉन आणि सुनक या दोन मोठ्या युरोपीय देशांचे नेते मोदींसोबत राजकीय चर्चा करताना दिसले. इतकेच नव्हे तर मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशीही चर्चा केली, ज्याचे राजकीय पटलावर खूप महत्त्वाचे संकेत आहेत. याशिवाय, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्याशी मोदींनी घेतलेली भेट देखील भारत-कॅनडा यांच्यातील सलोखा नव्याने प्रस्थापित करण्यावर भर देतानाच दिसत आहे.