फ्रान्स दौऱ्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता एक दिवसीय यूएई दौऱ्यावर आहेत. यूएईचे राष्ट्रपती खलिफा बिन झायेद अल नाहयान यांनी आज अबुधाबीच्या विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भव्य स्वागत केले. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक मुद्द्यांवर आणि धोरणात्मक भागीदारीवर चर्चा करणार आहेत. गेल्या 9 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा यूएईचा हा 5 वा दौरा आहे.
यूएईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद शेख झायेद यांचीही भेट घेतली. गेल्या वर्षी स्वत: बिन झायेद यांनी प्रोटोकॉल तोडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले होते. याशिवाय, 2019 मध्ये बिन सलमान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठा भाऊ म्हणून संबोधले होते. दरम्यान, यूएईच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संरक्षण, ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञानावर चर्चा करणार आहेत.
या दौऱ्यात दोन्ही देश ऊर्जा, अन्न सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रावर भर देणार आहेत. यासोबतच ऐतिहासिक व्यापार करारानंतर भारत आणि यूएई या कराराच्या प्रगतीचाही आढावा घेणार आहेत. दोन्ही देशांचे नेते नेहमीच एकमेकांच्या संपर्कात असतात. कोरोनाच्या काळातही दोन्ही देश एकमेकांशी जोडले गेले होते. दरम्यान, भारत आणि यूएईमधील व्यापारात एका वर्षात 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दोन्ही देशांचा व्यापार सुमारे 85 अब्ज अमेरिकन डॉलर आहे.
कसा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम?दुपारी 2.10 वाजता - औपचारिक स्वागत.दुपारी 3.20 वाजता - दुपारच्या लंचमध्ये उपस्थित राहतील.संध्याकाळी 4.45 वाजता - दिल्लीला रवाना होतील.
नरेंद्र मोदींचा दोन दिवसीय फ्रान्स दौरादोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर असलेले नरेंद्र मोदी शुक्रवारी बॅस्टिल डे सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून नरेंद्र मोदी बॅस्टिल डे परेडला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते. यादरम्यान त्यांनी शुक्रवारी 14 जुलै रोजी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. तसेच, या दरम्यान भारत आणि फ्रान्स यांच्यात मोठ्या संरक्षण करारावर शिक्कामोर्तब झाले. या अंतर्गत भारतीय नौदलाला फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशनकडून २६ नवीन अॅडव्हॉन्स राफेल लढाऊ विमाने मिळतील, जी नौदलाच्या गरजेनुसार खास तयार केली जातील. नरेंद्र मोदी आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीत हा करार झाला.