लुम्बिनी : भारत व नेपाळमधील घनिष्ठ संबंध हे मानवतावादी कार्यासाठीही खूप उपयोगी ठरतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मोदी यांनी सोमवारी नेपाळच्या दौऱ्यात भगवान बुध्द यांचे जन्मस्थान असलेल्या लुम्बिनी येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त प्रार्थना केली. या दौऱ्यात दोन्ही देशांत शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील देवाण-घेवाणीसंदर्भात सहा सामंजस्य करार करण्यात आले.
नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी यांनी नेपाळला भेट दिली. या दोन देशांच्या पंतप्रधानांनी आर्थिक, सांस्कृतिक, ऊर्जा व अन्य क्षेत्रात सहकार्य आणखी वाढविण्याचे एकमताने ठरविले आहे. मोदी यांनी सांगितले की, नेपाळ, भारतामध्ये सोमवारी झालेल्या सामंजस्य करारांमुळे दोन्ही देशांचे संबंध आणखी दृढ होणार आहेत.
भारत व नेपाळमध्ये २०२० साली सीमाप्रश्नावरून काहीसा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर दोन वर्षांनी मोदी पहिल्यांदाच नेपाळच्या दौऱ्यावर गेले होते. त्याआधी नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांच्या समवेत २ एप्रिल रोजी दिल्ली येथे विविध विषयांवर चर्चा केली होती. बौद्ध धर्मीयांसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या लुम्बिनी व कुशीनगर या दोन शहरांमध्ये उत्तम बंध निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे दोनही देशांनी सोमवारी ठरविले.
ऊर्जाक्षेत्रामध्ये आणखी सहकार्य वाढविण्याचे मोदी व देऊबा यांनी ठरविले असून, नेपाळमधील सेती जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी भारतीय कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
लुम्बिनी विद्यापीठात डॉ. आंबेडकर अध्यासन
- लुम्बिनी बुद्धिस्ट विद्यापीठामध्ये बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापन करण्यासंदर्भात इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स (आयसीसीआर) व त्या विद्यापीठात सोमवारी सामंजस्य करार झाला.
- काठमांडू विद्यापीठ व आयआयटी-मद्रास यांनी संयुक्तरीत्या पदव्युत्तर स्तरावरील एक अभ्यासक्रम सुरू करण्याचे ठरविले असून, त्याबातही मोदी यांच्या नेपाळ दौऱ्यात सोमवारी करार झाला.