Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धात भारत नेमका कोणाच्या बाजूने? PM मोदींनी जर्मनीत स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 02:17 PM2022-05-03T14:17:08+5:302022-05-03T14:17:35+5:30
Russia-Ukraine War: पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या परदेश दौऱ्यावर असून, तेथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
बर्लिन: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) परदेश दौऱ्यावर आहेत. तीन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स या तीन देशांना भेटी देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याची सुरुवात जर्मनीपासून झाली आहे. गेल्या सुमारे २ महिन्यांपासून रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) सुरू आहे. मात्र, कोणताही देश माघार घेण्यास तयार नाही. यातच पंतप्रधान मोदी यांनी याबाबत जर्मनी दौऱ्यात भाष्य केले आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धाचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटत असून अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर निर्बंध टाकत आपली भूमिका जाहीर केली आहे. भारताने मात्र दोन्ही देशांच्या वादात तटस्थ भूमिका घेतली आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीमध्ये बोलताना भारत शांततेचे समर्थन करत असून हे युद्ध संपवण्यासाठी आवाहन केले आहे. या युद्धात कोणताही देश विजयी होणार नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला
पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीच्या दौऱ्यावर चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांची भेट घेतली. दोन्ही देशांतील व्यावसायिक व सांस्कृतिक संबंधांना चालना देण्यासह विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यात आला. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेही यावेळी उपस्थित होते. यानंतर नरेंद्र मोदींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यापासून आम्ही युद्धविरामासाठी आग्रह करत आहोत. चर्चेनेच वाद मिटवला जाऊ शकत असल्याने आम्ही आवाहन केले. या युद्धात कोणत्याही देशाचा विजय होणार नाही तर प्रत्येकाचा पराभव होणार आहे. यामुळेच आम्ही शांततेच्या बाजूने आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
दरम्यान, आम्ही रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना पुन्हा आवाहन करत आहोत की, त्यांनी तेथील निरर्थक नरसंहार थांबवावा. त्यांना आपले सैनिक माघारी बोलवावेत. रशियाने आंतरराष्ट्रीय कायद्याचे मुलभूत सिद्धांत पायदळी तुडवले आहेत, असे आवाहन जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्त्झ यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा केल्यानंतर केले आहे. पंतप्रधान मोदी या युरोप दौऱ्यादरम्यान डेन्मार्क, फ्रान्सलाही भेट देणार आहेत.