PM Narendra Modi In UAE Abu Dhabi:संयुक्त अरब अमिराती आतापर्यंत बुर्ज खलिफा आणि झायेद मशिदीसाठी ओळखले जात होते. मात्र, आता यूएई हिंदू मंदिरांसाठीही ओळखले जाईल. या हिंदू मंदिराच्या निमित्ताने एका सांस्कृतिक अध्यायाची भर पडली आहे. येत्या काही वर्षांत मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतील, असा मला विश्वास आहे. या ठिकाणी येणाऱ्या भारतीयांची संख्याही वाढेल आणि संबंधही वाढतील, असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
अबुधाबी येथील BAPS स्वामीनारायण मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या भव्य मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती लाभली होती. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे आभारही मानले. सन २०१५ मध्ये इथे आलो होतो, तेव्हा अबुधाबीमध्ये हिंदू मंदिर बांधण्याची करोडो भारतीयांची इच्छा राष्ट्राध्यक्षांकडे व्यक्त केली होती. त्यांनी लगेच होकार दिला. फार कमी वेळात एवढी मोठी जमीन मंदिर उभारणीसाठी उपलब्ध करून दिली, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
भव्य हिंदू मंदिर संपूर्ण जगासाठी सौहार्द आणि एकतेचे प्रतीक बनेल
BAPS स्वामीनारायण मंदिर संपूर्ण जगासाठी सौहार्द आणि एकतेचे प्रतीक बनेल. या मंदिराच्या उभारणीत यूएई सरकारने घेतलेल्या भूमिकेचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या भव्य मंदिराचे स्वप्न साकार करण्यात सर्वांत मोठा आधार कोणाचा असेल तर तो राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचा लाभला. या हिंदू मंदिराच्या उभारणीतून यूएईने इतिहास रचला आहे, असे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना काढले.
भारतमातेचा पुजारी आहे आणि याचा मला अभिमान आहे
अबुधाबीमध्ये बांधलेले हे मंदिर तसे महत्त्वाचे आहे. या मंदिराने आपल्या प्राचीन काळापासून चालत आलेल्या संबंधांमध्ये नवी सांस्कृतिक ऊर्जा भरली आहे. हे केवळ प्रार्थनास्थळ नाही तर मानवतेचा समान वारसा आहे. भारतात राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. रामलला राम मंदिरात विराजमान झाले आहेत. संपूर्ण भारत आणि प्रत्येक भारतीय अजूनही त्याच आनंदोत्सवात आहे. माझे मित्र म्हणत होते की, मोदीजी हे सर्वांत मोठे पुजारी आहेत. मंदिराचा पुजारी होण्याची माझी पात्रता आहे की नाही, हे मला माहिती नाही, पण मी भारतमातेचा पुजारी आहे, याचा मला अभिमान आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
दरम्यान, १४० कोटी देशवासी माझे पूजनीय दैवत आहेत. अबुधाबीमधील या मंदिराचा साक्षीदार आहे. आपल्या वेदांत सांगितले आहे की, एकाच सत्याला, ईश्वराला विद्वान मंडळी वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगतात. हे तत्वज्ञान भारताच्या मूलभूत चेतनेचा भाग आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आपण सर्वांना स्वीकारतो आणि सर्वांचे स्वागतही करतो. आपल्याला विविधतेत द्वेष दिसत नाही, विविधता हेच आपले वैशिष्ट्य आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.