PM Narendra Modi Vladimir Putin meeting talks: पंतप्रधाननरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. मॉस्कोमध्ये मोदींचे रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी जोरदार स्वागत केले. पीएम मोदींची भेट घेतल्यानंतर पुतिन यांनी त्यांना मिठी मारली. यानंतर मोदी आणि पुतीन यांनी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यानंतर आज दोघांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. "बॉम्ब, बंदुका आणि गोळ्यांनी शांतता चर्चा यशस्वी होत नाहीत, संवादातूनच शांततेचा मार्ग निघेल," असे पंतप्रधान मोदींनी भारत-रशिया मैत्रीबद्दल बोलताना विधान केले.
संभाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना सांगितले, "गेली ५ वर्षे संपूर्ण जगातील सर्व लोकांसाठी अतिशय चिंताजनक आणि आव्हानात्मक आहेत. आम्हाला अनेक समस्यांमधून जावे लागले. प्रथम कोविडमुळे आणि नंतर देशाच्या अनेक भागांमधील संघर्ष आणि तणावाच्या काळामुळे लोकांसाठी अनेक समस्या निर्माण झाल्या. जग अन्न, इंधन आणि खताच्या संकटाचा सामना करत असतानाही भारत आणि रशियाच्या मैत्री आणि सहकार्यामुळेच मी माझ्या देशातील शेतकऱ्यांसाठी खतवाटपाच्या संकटातून मार्ग काढू शकलो."
"एक मित्र या नात्याने मी नेहमीच म्हणत आलो आहे की आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शांतता खूप महत्त्वाची आहे. पण हा उपाय युद्धभूमीवर शक्य नाही. बॉम्ब, बंदुका आणि गोळ्यांनी शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही. शांततेचा मार्ग हा संवादातूनच निघू शकेल. आपल्या या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या चर्चेतून सारे जग वेगवेगळ्या अपेक्षा ठेवून आहे. काल तुम्ही मला बोलावले, जिवलग मित्रासारखे ४ ते ५ तास अनेक विषयांवर चर्चा केली. आपण युक्रेनच्या समस्येवर उघडपणे आणि तपशीलवार चर्चा केली आणि एकमेकांची मते ऐकण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला याचा मला विशेष आनंद आहे," अशा शब्दांत मोदी यांनी भेटीचा तपशील सांगितला.