पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विदेश दौरा नेहमीच चर्चेचा विषय असतो. पंतप्रधान आजपासून दोन दिवसांच्या दुबई दौऱ्यावर गेले आहेत. वर्ल्ड क्लायमेट अॅक्शन समिट 'COP-28' मध्ये सहभागी होण्यासाठी ते दुबईत पोहोचले. त्यावेळी, मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावरही मोठी गर्दी पाहायला मिळाली. भारतीयांनी हाती तिरंगा ध्वज घेत सारे जहाँ से अच्छा हे गाणे म्हटले. तसेच, भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणाही दिल्या. मोदींच्या स्वागताने दुबई विमानतळावर देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
नरेंद्र मोदींचे विदेशात नेहमीच देशीस्टाईल स्वागत होते. मोदींच्या स्वागतासाठी भारतीय नागरिक विमानतळावर गर्दी करत असतात. मोदी मोदी.. तसेच भारत माता की जय अशा घोषणाही दिल्या जातात. आज, दुबई दौऱ्यातही पुन्हा एकदा मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले. तेथील भारतीयांनी अभिमानाने तिरंगा फडकावत भारत माता की जय च्या घोषणा दिल्या. येथील हॉटेलमध्ये मोदींनी भेटण्यासाठी भारतीयांनी गर्दी केली आहे.
नरेंद्र मोदींनी ट्विट करुन यासंदर्भात माहिदती दिली. "मी आज १ डिसेंबर रोजी COP-28 च्या जागतिक हवामान कृती शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दुबईला जात आहे. हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम UAE च्या अध्यक्षतेखाली आयोजित केला जात आहे, याचा मला आनंद आहे. हवामान कृतीच्या क्षेत्रात भारत एक महत्वाचा भागिदार आहे," असे मोदींनी म्हटले. तसेच, COP28, हे संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC) च्या 28 व्या बैठकीसाठी आहे. या वर्षी 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत UAE मधील दुबई येथे ही परिषद संपन्न होत आहे.
संयुक्त राष्ट्रच्या कॉन्फ्रेंस ऑफ पार्टीजदरम्यान शुक्रवारी विश्व जलवायू संबंधित शिखर परिषदेत मोदी भाग घेतील. या परिषदेला 'COP 28' असे नाव आहे. ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि जलवायू परिवर्तन लढाईच्या कार्यपद्धतींवर चर्चा करण्यासाठी अनेक जागतिक नेते जलवायू संबंधित शिखर परिषदेत भाग घेणार आहेत.
दरम्यान, दुबईत भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह 200 राष्ट्रांचे प्रमुख किंवा प्रतिनिधी या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत.