वॉशिंग्टन : उत्तर भारत आणि पाकिस्तानातील शहरांत धूरमिश्रित धुके पडत असून, आणखी काही महिने या शहरांना प्रदूषणाचा सामना करावा लागणार आहे. यामुळे ही शहरे प्रदूषणाच्या गंभीर अवस्थेत पोहोचू शकतात, असा इशारा समुद्रीय आणि वातावरणाचा अभ्यास करणा-या संघटनेने (एनओएए) केला आहे.भारतात दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्ये गत आठवड्यापासून विषारी प्रदूषणाने त्रस्त आहेत. यामुळे बांधकाम आणि वीटभट्ट्या बंद करण्यासारखे उपाय करण्यात येत आहेत. एनओएएने सॅटेलाइट फोटो जारी करून उत्तर भारत आणि पाकिस्तानमधील प्रदूषणांच्या कारणांची मीमांसा केली आहे. इंधनामुळे होणारे प्रदूषण आणि शेतात जाळला जाणारा काडीकचरा हे प्रदूषणामागचे कारण सांगण्यात आले आहे.शेजारील देश पाकिस्तानातही खराब हवामानामुळे या महिन्यात किमान ६०० पेक्षा अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एनओएएने असेही म्हटले आहे की, पाकिस्तान आणि उत्तर भारतात थंडी आणि स्थिर हवा यामुळे प्रदूषण वाढण्याची शक्यता अधिक आहे. सध्याच या शहरात प्रदूषणामुळे घराबाहेर बाहेर पडणे अवघड झाले आहे.नवी दिल्ली स्थित अमेरिकी दूतावासाने ७ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या काळात केलेल्या हवेच्या गुणवत्तेचा सूचकांक (एक्यूआय) ५०० पेक्षा पुढे पोहोचला आहे. ८ नोव्हेंबर रोजी स्थानिक वेळेनुसार, सायंकाळी ४ वाजता १०१० एवढा नोंदविला गेला आहे. (वृत्तसंस्था)कचरा जाळू नका -लखनौ : शहरी भागात कचरा जाळला जाऊ नये याची काळजी घ्या, असे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित अधिका-यांना दिले आहेत, तर रस्त्यांवर वाहने आणि धूळ, माती यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकांच्या टँकरमधून पाणी फवारावे, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. प्रदूषणाच्या मुद्यावर त्यांनी येथे वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेतली.पार्किंगचे शुल्क पूर्ववत -दिल्लीतील पार्किंगचे वाढविलेले शुल्क आणि ट्रकच्या प्रवेशावर बंदी हटविण्यात आली आहे. ‘पर्यावरण प्रदूषण - प्रतिबंध आणि नियंत्रण’चे (ईपीसीए) अध्यक्ष भुरेलाल यांनी दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणाच्या मुख्य सचिवांना याबाबत पत्र लिहिले आहे आणि या उपाययोजना तात्काळ प्रभावाने हटविण्यात याव्यात, असे निर्देश दिले आहेत.
प्रदूषणाचा विळखा होणार गंभीर, पाकिस्तानातील शहरेही विषारी वायूने त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:26 AM