पाकव्याप्त काश्मीरातील जनतेने पाकिस्तान पोलीस आणि प्रशासनाकडून होणाऱ्या क्रूर अत्याचाराविरोधत बंड पुकारले आहे. पाकिस्तानी पोलीस येथील जनतेचा आवाज दाबण्यासाठी आणि लाठिचार्ज आणि गोळीबारही करत आहे. पोलिसांकडून झालेल्या या हिंसाचारात एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला आहे. यानंतर, संतप्त जमावाने एका पोलीस अधिकाऱ्याला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली.
मुझफ्फराबाद आणि रावळकोट येथे स्थानिक लोक आणि पोलीस अधिकारी यांच्यात झटापट झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. एका अधिकाऱ्याने सीएनएन-न्यूज18 सोबत बोलताना म्हटले आहे की, अलीकडील निदर्शने आणि हिंसक दडपशाहीचा विचार करता, पाकिस्तान अनेक दशकांपासून बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवलेल्या भागावरील पकड गमावताना दिसत आहे. एवढेच नाही तर, रावळकोटमध्ये, भारतात पुन्हा विलीनीकरणाची मागणी करणारे पोस्टर्स देखील लावण्यात आले आहेत.
PoK तील या निदर्शकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधूराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. यानंतर लोक आणखी भडकले आणि त्यांनी या निदर्शनाने हिंसक वळण घेतले. ‘पाकिस्तान पीओकेवरील आपले नियंत्रण गमावताना दिसत आहे आणि तो पुन्हा एकदा भारताचा भाग होण्याच्या जवळ पाहोचला आहे. यादरम्यान जमावाने एका लष्करी गुप्तचर वाहनाचीही तोडफोड केली.
जम्मू काश्मीर जॉइंट अवामी ॲक्शन कमिटीने हे आंदोलन सुरू केले आहे. पाकिस्तान सरकारने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या कराराचे पालन न केल्याने, कमिटीने या संपूर्ण परिसरात 'बंद आणि चक्का जाम'चे आवाहन केले होते. वीजबिलावर लावण्यात आलेल्या अन्याय कारक कराच्या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या कमिटीच्या वतीने ऑगस्ट 2023 मध्येही करांबाबत संप पुकारला होता. जलविद्युतच्या उत्पादन खर्चानुसार वीज देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महत्वाचे म्हणजे, या आंदोलनाचे लोन आता पीओकेतील अनेक जिल्ह्यांमध्ये पसरले आहे. लोक पाकिस्तान पोलिसांची क्रूरता आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.