इस्लामाबाद : पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये (Pakistan occupied kashmir) विधानसभा निवडणुका (Election) होत आहेत. यावेळी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) च्या कार्यकर्त्यांनी जोरदार हिंसा घडविली. यामध्ये विरोधी पक्षाचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. यामुळे विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी तुमच्यापेक्षा भारत चांगला, असे म्हणत भारताला बोलविण्याचे वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Assembly Election held in Pakistan occupied kashmir today, violence broke out at voting centers. )
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी इम्रान खान यांना खडेबोल सुनावताना तुमच्यापेक्षा भारत चांगला आहे, कमीतकमी ते निवडणूक काळात हिंसाचार तर करत नाहीत, असे म्हटले आहे. पीओकेमध्ये 45 विधानसभा जागांसाठी आज मतदान झाले. या निवडणुकीमध्ये इम्रान खान यांची पीटीआय आणि नवाज शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) मध्ये कडवी टक्कर होत आहे. सोबत बिलावल भुट्टो यांची पाकिस्तान पीपुल्स पार्टी (पीपीपी) देखील आहे. मात्र, सत्ता आणि प्रशासनाच्या मदतीने इम्रान खान मतदान केंद्रांवर बेकायदेशीर कब्जा करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
नवाज शरीफ यांच्या पक्षाच्या उमेदवाराने भारताला बोलविण्याचे वक्तव्य केले आहे. इस्माईल गुज्जर हे LA 35 मतदारसंघात निवडणूक लढत आहेत. त्यांनी म्हटले की, सरकारने हिंसाचारावर रोख लावावी, नाहीतर हालत आणखी वाईट होईल. असे झाले तर येथील लोक मारले जातील. आम्हाला निवडणूक लढण्याचा हक्क नाहीय का, असेच सुरु राहिले तर मी भारताला बोलावेन. तुमच्यापेक्षा ते खूप चांगले, असे ते म्हणाले.
दरम्यान कोटली जिल्ह्याच्या एका मतदान केंद्रावर पीपीपी कार्यकर्ते आणि पीटीआय कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यामध्ये पीटीआयचे दोन कार्यकर्ते मारले गेले आहेत. त्यांची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. दुसरीकडे झेलम घाटी जिल्ह्यातील जमात ए इस्लामीच्या कार्यकर्त्यांनी एका मतदान केंद्रावर हल्ला केला, यामध्ये पाच पोलीस जखमी झाले आहेत. यामुळे मतदान केंद्रांवरील मतदान तात्पुरते थांबविण्यात आले होते. विविध ठिकाणच्या राड्यांमध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.