मुजफ्फराबाद – नीलम आणि झेलम नदीवरील अवैधरित्या बांधकाम करण्याविरोधात पाकव्याप्त काश्मीरमध्ये विरोध प्रदर्शन सुरु झालं आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेलं काश्मीर(पीओके) च्या मुजफ्फराबाद शहरात चीन आणि पाकिस्तानविरोधात लोकांनी आंदोलन केले आहे. नीलम झेलम आणि कोहला हाइड्रो पावर योजनेच्या अवैध निर्माणाविरोधात सोमवारी स्थानिकांकडून एक विशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.
आंदोलनकर्त्यांनी पाकिस्तान आणि चीनद्वारा निर्मित बंधाऱ्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होईल या मुद्द्याला जागतिक स्तरावर आवाज उचलण्यासाठी हॅशटॅग #SaveRiversSaveAJK असं ट्विटरवर सोशल मीडिया कॅम्पेन सुरु करण्यात आलं आहे. आंदोलनकर्त्यांना विचारले की, पाकिस्तान आणि चीन यांच्यात कोणत्या कायद्यांतर्गत वादग्रस्त क्षेत्र नदीचा करार झाला आहे? त्यावर पाकिस्तान आणि चीन नद्या काबीज करून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांचे उल्लंघन करीत आहेत. आम्हाला कोहला प्रकल्पाच्या दिशेने कूच करायला पाहिजे आणि तो थांबत नाही तोपर्यंत तिथे निषेध सुरू ठेवावा लागणार आहे असं आंदोलनकर्ते म्हणाले.
अलीकडेच कोहालामध्ये २.४ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीचा १ हजार १२४ मेगावॅट जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामासाठी चिनी कंपनीचा पाकिस्तान आणि चीन सरकार यांच्यात त्रिपक्षीय करार झाला. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी) अंतर्गत पीओके येथे झेलम नदीवर बांधण्यात येणाऱ्या हायड्रोपावर प्रकल्प कोहाला हायड्रोपावर कंपनी लिमिटेड (केएचसीएल) कंपनीला देण्यात आलं आहे. जी चायना थ्री गॉर्जेज कॉर्पोरेशन (सीटीजीसी) सहाय्यक कंपनी आहे.
भारत आणि चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर चीन पाकिस्तानशी हातमिळवणी करत पाकच्या सीमाभागात हे प्रकल्प सुरु करुन भारताची डोकेदुखी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. पूर्व लडाखमधील अनेक ठिकाणी गेल्या सात आठवड्यांपासून भारत आणि चिनी सैन्यामध्ये तणाव वाढला आहे आणि १५ जून रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकमकीत २० भारतीय सैनिक शहीद झाल्याने तणाव आणखी तीव्र झाला. चीन भारताच्या शेजारील नेपाळ आणि पाकिस्तानला हाताशी धरत भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र भारताची मुत्सद्देगिरीमुळे चीनचा डाव साध्य होत नसल्याने त्याचा तिळपापड होत आहे.