पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आल्यापासूनच त्यांच्या जुन्या उपद्व्यापांमुळे चर्चेत आहेत. त्यातच पीटीआयचे इम्रान खान आणि शाहबाज यांच्यातील राजकीय वाद सुरुच आहे. एका सरकारी कार्यक्रमात शाहबाज शरीफ यांना इम्रान खान यांच्या पक्षाच्या पंतप्रधानांनी त्यांना भाषणावेळी रोखले, यावर संतापलेल्या शरीफ यांनी त्या पंतप्रधानांचे इस्लामाबादमधील दोन मोठे मॉलच बंद करून टाकले आहे.
पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान हे पीटीआयचे आहेत. सरदार तन्वीर इलियास खान यांनी शरीफ यांना त्यांच्या भाषणावेळी मध्येच लुडबूड केली, यावरून हा प्रकार घडला आहे. स्थानिक यंत्रणेने शरीफ परत येत नाही तोच तन्वीर यांचे दोन मॉल अनधिकृत असल्याचे कारण देऊन सील केले आहेत.
सरदार तन्वीर इलियास खान हे इम्रान खान यांचे खास आहेत. सोबतच पीओकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. या सरकारी कार्यक्रमातील तणातणीचा व्हिडीओ आता व्हायरल होऊ लागला आहे. ६ डिसेंबरचा हा व्हिडीओ आहे. शरीफ भाषण करत असलेल्या कार्यक्रमात अनेक परदेशी पाहुणे आणि परदेशांचे राजदूत सहभागी झाले होते. काही वेळ झाल्यावर शरीफ समारोपाकडे वळले, तेवढ्यात तनवीर इलियास यांनी उभे राहून शरीफ यांना काहीतरी बोलण्यास सुरुवात केली. तेव्हा शरीफ यांनी त्यांना हाताने खाली बसण्यास सांगितले.
जसे शाहबाज भाषण संपवून गाडीकडे वळले तसे इलियास यांनी त्यांना भेटण्यासाठी धाव घेतली. परंतू भेट झाली नाही. 'पाकिस्तान टुडे'च्या वृत्तानुसार - पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) पायाभूत सुविधांची स्थिती अत्यंत वाईट आहे. येथील लोक उपासमारीचे बळी आहेत. या भागात वीज, पाणी, रस्ते, रुग्णालय अशा मूलभूत सुविधाही नाहीत. या राज्यात इम्रान यांच्या पक्षाचे (पीटीआय) सरकार आहे. येथे मुख्यमंत्रिपदाच्या ऐवजी पंतप्रधानपद जाणीवपूर्वक ठेवण्यात आले आहे.
पीओकेची अवस्था जगासमोर आली असती तर जगभरात पाकिस्तानची इज्जत गेली असती, यामुळे शरीफ त्यांना वेगळे भेटण्यास सांगत होते. तरीही इलियास भर कार्यक्रमात बोलू लागल्याने शाहबाज नाराज झाले.