Poland Missile Attack: रशियाने पोलंडवर मिसाईल डागले? अमेरिका, युरोपमध्ये उडाली खळबळ, युक्रेनचे मिसाईल असल्याचे समोर आले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 01:14 PM2022-11-16T13:14:22+5:302022-11-16T13:14:36+5:30
या मिसाईल हल्ल्यात पोलंडच्या दोन नागरिकांचा मृत्यू झाला. एका शेतात ट्रॅक्टरवर हे मिसाईल पडले. रशियाने पोलंडवर हल्ला केल्याच्या वृत्ताने युरोपमध्ये खळबळ उडाली.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची धग मंगळवारी पोलंडपर्यंत जाऊन पोहोचली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या या युद्धाने जगावर तिसऱ्या महायुद्धाची टांगती तलवार ठेवलेली असली तरी, अद्याप तिसऱ्या कोणत्या देशाची युद्धात उतरण्याची हिंमत झालेली नाहीय. अशातच मंगळवारी पोलंडमध्ये एक मिसाईल पडले आणि रशियानेच ते डागल्याच्या चर्चांना उधान आल होते.
या मिसाईल हल्ल्यात पोलंडच्या दोन नागरिकांचा मृत्यू झाला. एका शेतात ट्रॅक्टरवर हे मिसाईल पडले. रशियाने पोलंडवर हल्ला केल्याच्या वृत्ताने युरोपमध्ये खळबळ उडाली होती. परंतू, प्राथमिक चौकशीत काही वेगळेच समोर आले आहे. वृत्तसंस्था एपीने अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही मिसाईल युक्रेनने डागलेली होती, असे म्हटले आहे.
पोलंडमध्ये जे मिसाईल पडले ते युक्रेनचे होते. युक्रेनी सैन्याने रशियाच्या हल्ल्यांना प्रत्यूत्तर देण्यासाठी हे क्षेपणास्त्र डागले होते. मात्र, या मिसाईलची दिशा चुकली आणि ते पोलंडमध्ये जाऊन पडल्याचे समोर आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी देखील हे मिसाईल रशियाची असण्याची शक्यता कमीच असल्याचे म्हटले होते. कारण त्यानंतर एकही मिसाईल पोलंडच्या दिशेने आली नव्हती. तसेच रशियाकडूनही तशी काही हालचाल दिसली नव्हती.
दुसरीकडे पोलंडवर मिसाईल हल्ला केल्याच्या वृत्ताचे रशियानेदेखील खंडन केले होते. युक्रेन, पोलंडच्या सीमेवर रशियाने कोणताही हल्ला केलेला नाही, असे रशियाने म्हटले होते.
जी20 शिखर संमेलनातही पडसाद
पोलंडमध्ये मिसाईल पडल्याचे पडसाद जी20 शिखर संमेलनातही उमटले होते. या परिषदेत जी ७ देशांचे प्रमुख नेते होते. त्यांनी तातडीने यावर चर्चा केली होती. यानंतर काही वेळ वाट पाहिली गेली आणि नाटोकडून यावर संयुक्त माहिती देण्यात आली. यामध्ये पोलंडला चौकशीत सहकार्य करणार असल्याचे म्हटले होते.