ऑनलाइन लोकमत
शरीर विक्रय करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा सहभाग असलेलं आणि कॅलिफोर्नियातील तब्बल 31 पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग असलेलं सेक्स स्कँडल उघड झालं असून अमेरिकेत त्याचे चांगलेच पडसाद उमटले आहेत. वेश्यागृहांवर धाड पडणार आहे का अशा टिप्स किंवा पैसे देऊन अल्पवयीन मुलीला सेक्समध्ये या पोलीसांनी गुंतवल्याचा आरोप आहे. हे स्कँडल एवढं गाजतंय की शहर पोलीस प्रमुखाला राजीनामा द्यावा लागला आहे.
आता ही तरूणी सज्ञान असली तरी ती अल्पवयीन असल्यापासून हा प्रकार सुरू होता, आणि या तरुणीने ऑकलंडमधल्या 14 पोलीस अधिकाऱ्यांशी, रिचमंडमधल्या 5 अधिकाऱ्यांशी, सान फ्रान्सिस्कोमधल्या 3 अधिकाऱ्यांशी, स्टॉकटन व लिवरमोरमधल्या एकेक अधिकाऱ्याशी, अलमेडा काउंटीतल्या 4 अधिकाऱ्यांशी आणि काँट्रा कोस्टा कंट्रीच्या 3 अधिकाऱ्यांशी शरीरसंबंध ठेवल्याचे आणि काही प्रसंग तर ती अल्पवयीन असतानाचे असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर सेलेस्ट गुआप नावानं सदर तरूणी वावरत असून तिने फेसबुक पोस्ट व अन्य मेसेजच्या माध्यमातून खूप माहिती दिल्याचे बझफीड न्यूजनं म्हटलं आहे.
ऑकलंडचे महापौर लिब्बी स्काफ यांनी अखेर पत्रकार परिषद घेतली आणि ही आमच्यासाठी अत्यंत लाजिरवाणी घटना असल्याचे जाहीरपणे कबूल केले.
काही पोलीस अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत, अनेकांची चौकशी सुरू आहे आणि एकूणच कॅलिफोर्नियामधलं पोलीस खातं ढवळून निघालं आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी गुआप अल्पवयीन असताना तिच्यासोबत सेक्स केलं का, तिला पैसे दिले की प्रेमप्रकरण होतं, बेकायदेशीर घटना घडल्यात का अशा अनेक अंगांनी या स्कँडलचा तपास करण्यात येत असल्याचं वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.