ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. १५ - तब्बल १६ तासांनंतर सिडनी येथील कॅफे लिंड्टमधील ISIS च्या दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यास सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. ही गंभीर घटना हाताळण्यासाठी रॉयल ऑस्ट्रेलियन रेजिमेंटच्या कमांडोंना बोलवण्यात आले होते. या कमांडोंनी परिसराचा ताबाघेत योग्य व्यूहरचना करत कॅफेमधील लोकांना सुखरुप सोडवण्यात यश मिळवले. भारतीय वेळेनुसार रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्याला ठार केले. शेक हारून मोसीन असे या दहशतवाद्याचे नाव आहे. त्याने कॅफेमधील ३०-४० जणांना ओलीस ठेवले होते. तसेच पोलिसांनी जनतेच्या सुरक्षेला अधिक महत्व देत दहशतवाद्याशी बोलणी केली असता त्याने ISIS या संघटनेचा झेंडा कॅफेमध्ये पाठवावा, तसेच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टॉनी अबोट यांच्याशी संवाद साधण्याची मागणी या दहशतवाद्याने केली होती.
ओलीस ठेवलेल्या लोकांमध्ये भारतीय नागरिकाचाही समावेश असल्याचे संसदीय कामकाज मंत्री वैंकय्या नायडू यांनी सांगितले होते. दहशतवाद्याला ठार केल्यानंतर इन्फोसिस कंपनीचे कर्मचारी विश्वकांत एंकरेड्डी हे सुखरुप बाहेर आले असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले.
स्थानिक वृत्तवाहिनीच्या फूटेजनुसार या कॅफेच्या खिडकीत काहीजण हात वर करून उभे असल्याचे दिसत होते. कॅफेच्या खिडक्यांवर अरबी भाषेत लिहीलेले झेंडेही दिसत होते. ओलीसांच्या सुटकेसाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आल्यावर हा कॅफे ज्या भागात आहे तो परिसर, महत्वाच्या इमारती तसेच ऑपेरा हाऊस रिकामे करण्यात आले. संपूर्ण परिसराला पोलिसांनी घेराव घातला. तसेच सिडनी शहराजवळून जाणारा हवाई मार्ग बंद करण्यात आला आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी या घटनेबाबात चिंता व्यक्त केली आहे. थोड्याच वेळापूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नागरिकांना घाबरून न जाता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सिडनीतील ही घटना अमानवी व दुर्दैवी असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर व्यक्त केले आहे. सर्वांची सुखरूप सुटका व्हावी अशी प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
भारतीय क्रिकेट संघाची सुरक्षा वाढवली..
सिडनीत झालेल्या या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या दौ-यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बीसीसीआयचे अधिकारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिका-यांशी सतत संपर्कात आहेत. भारतीय खेळाडू सध्या ब्रिस्बेनमध्ये असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे अधिका-यांनी सांगितले आहे.