तंत्रज्ञानाचा कोण कुठे कसा वापर करेल याबाबत काहीही सांगता येत नाही. तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. अॅपल एअरटॅगद्वारे एका व्यक्तीनं आपल्या एक्स गर्लफ्रेन्डला ट्रॅक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. ही घटना अमेरिकेतील असून २७ वर्षीय झेविअर मॅगारिन हा आपल्या एक्स गर्लफ्रेन्डचं लोकेशन ट्रॅक करून तिला सतावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासाठी त्यानं अॅपलच्या एअरटॅगचा वापर केला. इतकंच नाही कोणाला याची माहिती मिळू नये यासाठी त्यानं ते डिव्हाईस तिच्या कारच्या खाली इन्स्टॉल केलं.
सीबीएस न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार AirTag च्या बीपिंग साऊंडमुळे तिला ट्रॅक केलं जात असल्याची माहिती मिळाली. रिपोर्टनुसार झेविअर आणि त्याच्या गर्लफ्रेन्डनं मार्च महिन्यात ब्रेकअप केलं होतं. त्याच्यानंतरच त्या पोलीस कर्मचाऱ्यानं तिच्या गाडीखाली एअरटॅग इन्स्टॉल केलं. काही आठवडे तो तिला मेसेज करून लोकेशनबद्दल प्रश्न विचारत होता. परंतु काही दिवसांनंतर त्यानंच तिला मेसेज करून एअरटॅग इन्स्टॉल केल्याची माहिती दिल्याचंही सांगण्यात आलं.
तपासादरम्यान तिच्या कारमध्ये लावण्यात आलेला एअरटॅग त्या मुलाच्या खासगी ईमेल आयडीवर रजिस्टर असल्याचं दिसून आलं. तिच्या कारमध्ये रिअर बम्परच्या आत हेवी ड्युटी टेपनं एअरटॅग चिकटवून ठेवल्याचंही पोलिसांना दिसून आलं. दरम्यान, यानंतर त्या व्यक्तीवर ट्रॅकिंग डिव्हाईस लावून पाठलाग करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच त्याची हकालपट्टीही करण्यात आली आहे.