पाकिस्तानमध्ये पोलिओ लसीकरण पथकावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात चार पोलिसांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दोन पोलीसही जखमी झाले आहेत. टँक जिल्ह्यातील गुल इमान परिसरात पोलिओ लसीकरणासाठी लसीकरण मोहीम सुरू असताना हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी पथकाच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसांना लक्ष्य केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिओ लसीकरणासाठी टीम गुल इमान परिसरात पोहोचली होती. त्याचवेळी अज्ञात हल्लेखोरांनी पोलिसांच्या मोबाईल व्हॅनवर हल्ला केला. हल्लेखोर आणि पोलिसांमध्ये बराच वेळ गोळीबार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी पोलिसांना उपचारासाठी तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी केली आहे. पाकिस्तानमधील पोलिओ लसीकरण पथकावर झालेला हा पहिला हल्ला नाही. यापूर्वी दक्षिण वझिरीस्तानच्या एका जिल्ह्यातही असाच हल्ला झाला होता. अधिकार्यांच्या मते, पोलिओ लसीकरण कार्यक्रमांतर्गत 37 लाखांहून अधिक मुलांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.