पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या खुर्चीवर संकटाचे ढग घिरट्या घालत आहेत. काउंटडाऊन सुरू झाले असून आज इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव पाकिस्तानच्या संसदेत चर्चा करण्यात आली आहे. 3 ते 4 एप्रिल रोजी पाकिस्तान संसदेत इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
इम्रान खान राजीनामा न देण्यावर ठाम आहेत. दरम्यान, पीएमएल (एन) नेत्या मरियम नवाज यांनी मुदतपूर्व निवडणुकांबाबत भाष्य केले आहे. या समस्येवर नव्याने निवडणुका हा एकमेव उपाय असल्याचे मरियम नवाज यांनी म्हटले आहे. तसेच, आता सेलिब्रेशनची वेळ आली आहे. आता संपूर्ण पाकिस्तानात जल्लोष होणार आहे. हे सरकार बुडाले असून बुडालेल्या लोकांसोबत कोणीही नसते. आमचे संपूर्ण लक्ष नो कॉन्फिडंट मोशनवर आहे, असेही मरियम नवाज म्हणाल्या.
नंबर गेममध्ये अडकले आहेत इम्रान खान...इम्रान खान नंबर गेममध्ये अडकले आहेत. पाकिस्तानच्या संसदेत एकूण 342 सदस्य आहेत, त्यापैकी सत्तेत राहण्यासाठी 172 सदस्यांची गरज आहे. इम्रान यांना 179 सदस्यांचा पाठिंबा होता, त्यापैकी 51 बंडखोर झाले आहेत. आता इम्रान खान यांना पाठिंबा देणारे 128 सदस्य आहेत, म्हणजेच बहुमतापेक्षा 44 कमी आहेत. दुसरीकडे, विरोधी पक्षांबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्याकडे 162 सदस्य होते, यामध्ये जर 51 अधिक जोडले तर त्याचा आकडा 213 पर्यंत वाढतो, म्हणजे बहुमतापेक्षा 41 अधिक. त्यामुळे बंडखोर सदस्य विरोधकांसोबत गेले तर विरोधक सरकार स्थापन करू शकतात.