हरारे - झिम्बाब्वेत राजकीय संकट निर्माण झालं आहे. बुधवारी लष्कराने देशाची सर्व सूत्रं आपल्या हाती घेतली आहेत. राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. लष्कराचं म्हणणं आहे की, गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी रक्त न सांडता हे सत्ता परिवर्तन करण्यात आलं आहे. सकाळी स्थानिक प्रसारमाध्यमांनी लष्कराने सत्ता हाती घेतल्याचं वृत्त देण्यास सुरुवात केली होती. मात्र लष्कराने पूर्णपणे नकार दिला होता. या संपूर्ण घटनाक्रमादरम्यान, झिम्बाब्वेत राहत असलेल्या ब्रिटनच्या नागरिकांना घरातच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
झिम्बाब्वे लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती मुगाबे आणि त्यांची पत्नी पूर्णपणे सुरक्षित असून आपल्या ताब्यात आहे. लष्कर सरकारी कार्यालयं आणि रस्त्यांवर पेट्रोलिंग करत आहे. देशाचे उपराष्ट्रपती इमरसन मनंगावा यांच्या बरखास्तीनंतर लष्कराने राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांना आव्हान दिलं होतं. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्रपती जॅकब जुमा यांनी झिम्बाब्वे सरकार आणि सुरक्षा दलांना देशातील परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी आवाहन केलं आहे.
लष्कराकडून माहिती देण्याआधी काही तासांपूर्वी लष्कराच्या 100 तुकड्या हरारेत रस्त्यांवर पेट्रोलिंग करताना दिसल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत टँकही होते. हरारेच्या रस्त्यांवर स्फोट झाल्याची माहिती लष्कराला मिळाली होती आणि राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांच्या सुरक्षेसाठी ते तिथे उपस्थित होते, अशी माहिती त्यावेळी देण्यात आली होती.
दरम्यान, उपराष्ट्रपती मनांगाग्वा यांच्या बरखास्तीपाठीमागे मनांगाग्वा आणि राष्ट्रपती मुनाबे यांची पत्नी ग्रेस यांच्यातील वाद कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. झिम्बाब्वेच्या पुढील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ग्रेस यांच्या नावाची सत्तारुढ पक्षाकडून जोरदार चर्चा आहे. पण त्यांना मनांगाग्वा यांचं कडव आव्हान असल्याचं बोललं जात आहे.
(फोटो सौजन्य - एएफपी)