लंडन - जगातील बलाढ्य देशांपैकी एक असलेल्या ब्रिटनमध्ये सध्या महाराष्ट्राप्रमाणेच राजकीय उलथापालथ सुरू आहे. मंगळवारी रात्री ब्रिटनचे वित्तमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी राजीनामा दिल्याने ब्रिटनमधील बोरिस जॉन्सन यांच्य नेतृत्वाखालील सरकार अडचणीत आले आहे. हे दोन्ही नेते पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे निकटवर्तीय मानले जातात. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यामुळे आधीपासूनच विवादात सापडलेले पंतप्रधान जॉन्सन यांच्यावर राजीनामा देण्यासाठीचा दबाव वाढला आहे.
आता अशा परिस्थिती बोरिस जॉन्सन यांनी पद सोडल्यास येणाऱ्या काही दिवसांमध्ये ऋषी सुनक हे त्यांचे उत्तराधिकारी बनून पंतप्रधान बनतील का अशी चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही मंत्रांच्या राजीनाम्यानंतर जॉन्सन यांनी नादिम जाहवी यांची नवे वित्तमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. तर ब्रिटीश कॅबिनेटचे चिफ ऑफ स्टाफ स्टीव्ह बर्कले यांच्याकडे आरोग्य सचिव म्हणून जबाबदारी सोपवली गेली आहे.
बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्यास पंतप्रधान म्हणून कुणाला पसंती मिळेल, याबाबतची काही नावं समोर आली आहेत. यामध्ये ऋषी सुनक यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे. सुनक हे भारतीय उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. त्यांच्याबरोबरच लिज ट्रूज, जेरेमी हंट, वेन वॉलेस, नदीम जहावी आणि पेनी मॉर्डेंट यांची नावं पंतप्रधानपदासाठी आघाडीवर आहेत.