जिनिव्हा : इटलीतील जिनिव्हा येथे रेल्वेमार्गावर उड्डाणपूल कोसळून 39 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर इटलीचे पंतप्रधान ज्यूसपे कान्टे यांनी बुधवारपासून 12 महिन्यांसाठी आणीबाणी लागू केली आहे. तसेच या घटनेची चौकशी आणि बचाव कार्यासाठी 40 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.
मंगळवारी झालेल्या या दुर्घटनेमध्ये मोरांदी पूल कोसळल्याने 35 कार व काही ट्रक 150 फूट खाली पडल्या होत्या. यात 39 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पुलाच्या मलब्याखाली बरेचजण दबले असण्याची शक्यता आहे. बचाव कार्य बुधवारी सायंकाळपर्यंत सुरु होते. रेल्वे मार्गावर हा पूल पडल्याने रेल्वे सेवाही ठप्प झाली आहे.
दरम्यान, या पुलाची देखरेख करणारी कंपनी ऑटोस्ट्रेडवर कारवाई करण्यात येणार असून या कंपनीची मान्यता काढून घेण्यात येणार असल्याचे कान्टे यांनी सांगितले.
१९६७ साली हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. ९० मीटर उंच आणि १ किलोमीटर लांबीचा हा पूल फ्रान्सच्या दिशेने जाणाऱ्या १०, तर उत्तर मिलानच्या दिशेने जाणाऱ्या सात मुख्य मार्गांना जोडतो.