तुम्ही लॉटरीचं तिकीट खरेदी करता? किती वेळा? कशासाठी?.. खरंच आपण श्रीमंत, गलेलठ्ठ व्हावं असं तुम्हाला वाटतं? - अर्थात पुढच्या दहा पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती आपल्याकडे असावी असं कोणाला वाटत नाही? - सगळ्यांनाच वाटतं.. पण, त्यासाठीचा मार्ग इतका सोपा, म्हणजे लॉटरीच्या पद्धतीनं असावा का? याबाबत अनेक मतमतांतरं पाहायला मिळतील.. कोणी म्हणेल, पाच-पंचवीस रुपयांचं लाॅटरीचं तिकीट खरेदी करून ‘जॅकपॉट’साठी नशीब आजमावायला काय हरकत आहे? काहीजण म्हणतील, लॉटरीमुळे तुम्ही तुमच्या स्वत:वरचा, तुमच्या मनगटावरचा विश्वास गमावता. त्याचं ‘व्यसन’ तुम्हाला... त्यामुळे लॉटरी वगैरे शक्यतो नकोच !
काहीही असो, पण सध्या फ्रान्समधल्या एका व्यक्तीला लागलेला ‘जॅकपॉट’ चांगलाच चर्चेत आहे. जगात आतापर्यंतच्या जॅकपॉटमधील हा सर्वांत मोठा जॅकपॉट समजला जातो. काही देश एकत्रितरीत्या समाविष्ट असलेला हा आंतरराष्ट्रीय जॅकपॉट होता. त्याच्या बक्षिसाची रक्कम आहे तब्बल दोनशे मिलियन युरो ! भारतीय रुपयांत त्याची किंमत होते साधारण १६ अब्ज रुपये ! पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जॅकपॉट ज्या व्यक्तीला लागला, त्या व्यक्तीचं नाव अजून अज्ञात आहे. आपलं नाव कुठेही जाहीर करू नये, अशी त्याची इच्छा आहे.
म्हटलं तर ही लॉटरीही तशी जुनी आहे, साधारण दीड वर्षांपूर्वी त्याला हा जॅकपॉट लागला, पण आपलं नाव प्रसिद्ध व्हावं अशी त्याची इच्छा नाही. त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे या एवढ्या प्रचंड रकमेतला एक छदामही त्यानं स्वत:साठी ठेवला नाही. ही सगळीच्या सगळी रक्कम पर्यावरणाच्या संरक्षणासाठी तो वापरणार आहे. त्यासाठी ‘अन्यामा’ नावाची एक संस्थाही त्यानं स्थापन केली आहे. त्यासंदर्भात एक वेबसाइटही त्यानं बनवली आहे, पण त्यातही त्यानं आपलं स्वत:चं नाव गुप्तच ठेवलं आहे. या लॉटरीचं व्यवस्थापन फ्रान्सची ‘एफडीजे’ ही कंपनी करते. त्यांनाही त्यानं पत्र पाठवताना म्हटलं आहे, की मला मिळालेली ही रक्कम मला नको. ती जगातल्या पर्यावरण संवर्धनासाठी वापरली जावी. या पत्रातही स्वत:च्या नावाऐवजी ‘Guy’ असं म्हणून त्यानं सही केली आहे. इंग्रजी भाषेत ‘Guy’ म्हणजे कोणीही सर्वसामान्य व्यक्ती ! यासंदर्भात ‘एफडीजे’ या कंपनीच्या प्रमुख इसाबेल यांचं म्हणणं आहे, एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीनं अशा प्रकारची दानशूरता दाखवावी, समाजाप्रती, येणाऱ्या पिढ्यांसाठी इतकी आत्मीयता दाखवावी, ही गोष्टच अतिशय विरळ ! त्यांच्या इच्छेचा आम्ही सन्मान करतो..
एका माध्यम प्रतिनिधीशी बोलताना हा ‘गाय’ सांगतो, आपण गर्भश्रीमंत असावं, आपल्याकडे गाड्याघोडे, बंगले, राजवाडे असावेत, असं स्वप्न मी कधीच पाहिलं नाही. त्यात मला रसही नाही. सर्वसामान्य माणसांप्रमाणे आयुष्य जगावं असं मला आजही वाटतं, त्यामुळेच इतका पैसा मिळाला, तरी त्यावर माझा हक्क नाही, समाजाचं त्यातून काहीतरी भलं व्हावं असं मला वाटतं, म्हणूनच मी हा पैसा पर्यावरणासाठी वापरायचं ठरवलं आहे.
‘गाय’ सध्या फ्रान्समध्ये रिटायर्ड आयुष्य जगत असला तरी, मूळचा तो ‘आयव्हरी कोस्ट’ या पश्चिम आफ्रिकन देशाचा आहे. आपल्या देशामुळेच पर्यावरणासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे अशी प्रेरणा त्याला मिळाली. अर्थात त्याचं कारण मात्र नकारात्मक होतं. कारण आपल्या देशाच्या जंगलातील कापलेल्या झाडांचे मोठमोठे ओंडके भरभरुन एकामागोमाग ट्रक जात असतानाचं दृश्य त्यानं अनेकदा पाहिलं होतं. त्यामुळे तो हळहळला होता आणि त्याला प्रचंड वाईट वाटलं होतं, संतापही आला होता.. परंतु तो त्यासाठी काहीही करू शकत नव्हता. त्यानंतर मात्र त्यानं एक गोष्ट करायला सुरुवात केली. जेव्हा जेव्हा मोठ्या रकमेचा जॅकपॉट असेल, त्यावेळी त्यानं लॉटरीचं तिकीट खरेदी करायला सुरुवात केली. आपल्याला लॉटरी लागणार नाही, लॉटरीवर विसंबून राहाण्यात काही अर्थ नाही, हे त्याला पक्कं माहीत होतं, नशीब असलंच जोरावर तर आपल्यालाही एखादेवेळी जॅकपॉट लागून जाईल या भावनेपोटीच तो लॉटरीचं तिकीट खरेदी करीत होता. ‘गाय’चं स्वत:चंही म्हणणं आहे, की लॉटरीच्या तिकिटांच्या नादी लागू नका. त्यावर वायफळ खर्च करू नका. त्या भरवशावर नशीब अजमावत राहिलात, तर तुम्ही निष्क्रिय तर व्हालच, आपल्या घरादाराचंही वाटोळं कराल..
दुसऱ्यांचा विचार करणारे ‘गरीब दानशूर’! इतकी मोठी रक्कम सर्वसामान्य लोकांच्या भल्यासाठी म्हणून ‘दान’ करणारा ‘गाय’ जगावेगळा असला, तरी असेही काहीजण आहेत, ज्यांनी आपल्या जॅकपॉटची रक्कम खूप मोठ्या प्रमाणात समाजासाठी खर्च केली. टॉम क्रिस्ट या कॅनडाच्या नागरिकाला काही वर्षांपूर्वी चाळीस दशलक्ष डाॅलरचा जॅकपॉट लागला होता, पण त्यानंही ही सगळी रक्कम कॅन्सरवरील संशोधनासाठी दान केली. कारण त्याच्या बायकोचा कॅन्सरनं मृत्यू झाला होता. अमेरिकेतील एका गुराख्याला सर्व कर वगैरे वगळता ८८.५ दशलक्ष डॉलर रक्कम मिळाली होती. त्यानंही त्यातील थोडी रक्कम कुटुंबासाठी वापरून बाकी रक्कम आपल्यासारख्य गरीब लोकांच्या कल्याणासाठी खर्च केली होती..