ऑनलाइन लोकमत
रोम, दि. 25 - मुस्लीम, ख्रिश्चन व हिंदू निर्वासिंताचे पाय धुवून व नंतर पायाचे चुंबन घेऊन पोप फ्रान्सिस यांनी ही सर्व ईश्वराची लेकरे असल्याचे जाहीर केले. ब्रसेल्समधल्य हल्ल्यांनंतर मुस्लीमविरोधी भावना युरोपमध्ये बळावत असताना शांतता रहावी, धर्मा-धर्मामध्ये वैर बलावू नये यासाठी पोपनी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे.
पवित्र गुरुवारी म्हणजे काल ही पादपूजा पोपनी केली. या दिवसाला महत्त्व आहे. क्रूसावर जाण्यापूर्वी येशू ख्रिस्तांनी आपल्या 12 अनुयायांचे पाय धुतले होते. स्थलांतरीतांचे पाय धुताना दहशतवादी स्थलांतरीत व स्थानिकांच्यामध्ये असलेल्या बंधुत्वाची भावना नष्ट करू इच्छितात असे पोपनी सांगितले.
एकूण 12 जणांचे पाय पोपनी पवित्र पाण्याने धुतले व त्यांचे चुंबन घेतले. यामध्ये इटालीतील कॅथलिक महिला, तीन कॉप्टिक ख्रिश्चन महिला, नायजेरियामधले 4 ख्रिश्चन पुरूष, माली, सीरिया व पाकिस्तानमधले तीन मुस्लीम पुरूष व भारतातला एक हिंदू पुरूष अशा 12 जणांचा समावेश होता. यावेळी स्थलांतरीसोबत पोप फ्रान्सिस यांनी सेल्फीही काढला.