चीन : सध्या साहसी खेळांकडे मुलं करिअरच्या दृष्टीने पाहू लागले आहेत. त्यातून अनेकांनी किर्ती आणि पैसा कमावलाय. लोक अशा साहसी खेळाडूंच्या प्रेमात असतात. साहजिकच असे खेळ करायचे म्हणजे तितकंच मेहनत करावी लागते. पण असाच साहसी खेळ करून नेहमीच प्रसिद्धी झोतात राहणाऱ्या एका चिनी सुपरमॅनचा स्टंट्सदरम्यान मृत्यू झालाय. एका उंच इमारतीच्या भिंतीवर तो कवायती करताना खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
दि सनने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये राहणारा २६ वर्षीय वांग याँगनिंग नेहमी अशा विविध कसरती करत असायचा. उंच इमारतींवर भिंतीद्वारे सरसर चढणे, चपळाईने छतावर चढणे, उंचीवरुन वेगाने धावणे अशा कसरती तो सहज करायचा. अनेकविध स्टंटचा त्याला चांगलाच अनुभव होता. मात्र तरीही एका टोलेजंग इमारतीवर कवायती करताना तो ६२ व्या मजल्यावरून खाली कोसळला आणि त्याचा जागीच अंत झाला. ६२ व्या मजल्यावरून पडल्यानंतर त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला.
वांग याँगचिंग याला उंचच उंच गोष्टी स्टंट करण्याची आवड होती. अशा उंच ठिकाणी जाऊन तो फोटो काढत असे. तसेच त्याचे असे अनेक स्टंट व्हिडीयो सोशल मिडीयावर हिट ठरले आहेत. त्याच्या निडर वृत्तीमुळे त्याला जगभरातून फॅन फॉसोव्हिंग होतं. या सगळ्यांना नेहमीच काहीतरी नवं बघता यावं याकरता तो नेहमी काहीतरी वेगळं आणि हटके करण्याचा प्रयत्न करत असे. म्हणूनच काही दिवशी चीनच्या चांगशा शहरातील एका टॉवरच्या छतावर गेला. त्या छतावर त्याने भिंतीना लटकत व्यायामाला सुरुवात केली. त्याची ही कसरत शूट व्हावी याकरता त्यानेच समोरच्या बाजूला व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू ठेवली होती. एक-दोन वेळा त्याने पुशअप्स केले. त्यानंतर मात्र त्याला हे सगळं त्याच्या पात्रतेच्या पलीकडलं वाटलं. त्यामुळे तो पुन्हा भिंतीवरून योग्य ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तिथं दुसरं कोणीच नसल्याने त्याला पुन्हा वर येणं कठीण झालं. शेवटी त्याच्या हातातील ताकद संपली आणि तो धाडकन खाली कोसळला. हा सगळा प्रकार त्यानेच शूट करण्यासाठी ठेवलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला. त्याचा मृतदेह एका क्लिनरला दुसऱ्या दिवशी सापडला.
अपघातादरम्यान शूट झालेला व्हिडिओ आता सोशल मीडियावर बराच व्हायरल झालाय. अनेकांनी आपल्या हिरोचा मृत्यू डोळ्यांसमोरून पाहिल्याने त्याच्या फॅन्सनी याबाबत दु:ख व्यक्त केलंय. चीनच नव्हे तर जगभरात याचे फॅन्स होते. त्यामुळे त्याचं असं अचानक निघून गेल्याने सगळीकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.हा प्रकार घडल्यानंतर तरुणांना हाच संदेश देण्यात येतोय की तुम्ही कितीही निडर असला तरीही अशी स्टंटबाजी अजिबात करू नका. कारण अशा प्रकारे तुमचाही जीव जाऊ शकतो.