मिशीगन : नवनवीन तंत्रज्ञान जसे सोयीचे आहे तसे ते धोकादायकही आहे. हॅकर्सकडून मोठा धोका या तंत्रज्ञानाला आहे. अनेकदा वेबसाईट, बँक खाती हॅक करून त्यावरून लुटले जात आहे. असाच एक प्रकार अमेरिकेमध्ये घडला आहे. हॅकर्सनी हाय़वेवरील डिजिटल बोर्डवर पॉर्न क्लीप लावल्याने एकच खळबळ उडाली होती. धक्कादायक म्हणजे 20 मिनिटे ही क्लीप सुरू होती.
हॅकर्सनी काही दिवसांपूर्वीच बिलबोर्डचा (डिजीटल होर्डिंग) नियंत्रण कक्ष हॅक केला होता. वाहन चालकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचे आता समोर आले आहे. अमेरिकेच्या मिशीगनमध्ये हा प्रकार घडला आहे. तेथील ऑबर्न हिल्स परिसरातील हायवेवरील डिजिटल बोर्ड हॅक करण्यात आला होता. पोलिसांनी सांगितले की हॅकर्स कंट्रोल रुममध्ये घुसले होते. त्यांनी तेथील कॉम्प्युटर हॅक करून व्हिडिओ बिलबोर्डवर सुरू केले.
हे व्हिडिओ रात्री 12 च्या सुमारास दाखविण्यात आले. 20 मिनिटे चालल्यानंतर कंपनीने ते बंद केले. या दरम्यान हायवेवरून जाणाऱ्या चालकांनी याबाबतची माहिती ट्विटरवर दिली. अनेकांना या प्रकाराबाबत हसू येत होते, तर अनेकांना धक्काही बसला होता. महत्वाचे म्हणजे या काळात या ठिकाणी अपघात झाला नाही.
या हॅकरना पकडण्यात पोलिसांना अपय़श आले आहे. त्यांना अटक झाल्यास 90 दिवसांचा तुरुंगवास आणि 500 डॉलरचा दंडही होणार आहे. तसेच कंट्रोल युनिटमध्ये विना परवानगी घुसल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
असा प्रकार काही वर्षांपूर्वी पुण्यातही झाला होता. कर्वे रस्त्यावरील एका जाहिरातीच्या फलकावर त्या कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून पॉर्न क्लीप लावण्यात आली होती.