इस्लामाबाद : द्विपक्षीय व्यापारी संबंध अधिक दृढ करण्यासोबत भारताला व्यापा:याच्या दृष्टीने सर्वाधिक प्राधान्यपर राष्ट्राचा (एमएफएन) दर्जा देण्याची प्रक्रिया पाकिस्तान पुन्हा सुरू असल्याचे सूतोवाच पाकिस्तानचे विदेश सचिव एजाज अहमद चौधरी यांनी स्पष्ट केले.
25 ऑगस्ट रोजी दोन्ही देशांच्या विदेश सचिवांची बैठक होत आहे. द्विपक्षीय व्यापार वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांत सातत्याने चर्चा होत आली आहे.
यासंदर्भात पाकिस्तानचे वाणिज्य मंत्रलयही महत्त्वपूर्ण भूमिका घेत आले आहे, तसेच परस्पर हिताच्या आधारावर सकारात्मक कामही झाले आहे. उभय देशांदरम्यान पुन्हा वाटाघाटी सुरू झाल्यानंतर भारताला सर्वाधिक प्राधान्यपर राष्ट्राचा दर्जा देण्यासह द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दिशेने आणखी ठोस प्रगती होईल, अशी आशा चौधरी यांनी व्यक्त केली.
परस्पर वाटाघाटींची प्रक्रियाच रखडल्याने भारत- पाकिस्तानदरम्यान द्विपक्षीय संबंधाच्या दृष्टीने फारशी प्रगती होऊ शकली नाही. (वृत्तसंस्था)