ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - अंधेरीत रहाणा-या चाफेकर कुटुंबासाठी मंगळवारचा दिवस अन्य दिवसांसारखाच होता. पण दुपारी एक वाजता ब्रसेल्सवरुन आलेला घरातला फोन खणखणला आणि घरातील संपूर्ण वातवरणच बदलून गेले. आनंदाच्या जागी चाफेकर कुटुंब दु:ख, वेदना, चिंतेमध्ये बुडून गेले. जेट एअरवेजमध्ये इनफ्लाईट मॅनेजर म्हणून काम करणारी निधी चाफेकर ब्रसेल्स विमानतळावरील स्फोटात जखमी झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली.
निधी आणि अमित मोटवानी हे जेटचे क्रू मेंबर्स या स्फोटात जखमी झाले आहेत. अमित मोटवानी खारला रहातो. निधीला अँटवरर्प येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निधीची देखभाल आणि काळजी घेण्यासाठी कुटुंबातील सदस्याची ब्रसेल्सला जाण्याची व्यवस्था जेट एअरवेजकडून करुन देण्यात आली आहे. निधीला वैद्यकीय उपाचरांमध्ये कोणतीही कमतरता भासू नये यासाठी ब्रसेल्स येथील जेटचे कर्मचारी रुग्णालयाच्या संपर्कात असल्याची माहिती जेटकडून देण्यात आली आहे. निधीचे पती रुपेश चाफेकर ब्रसेल्सला जाण्याची शक्यता आहे.
निधी काही ठिकाणी भाजली असून, तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिच्याशी बोलता येईल अशी अपेक्षा आहे असे रुपेशने सांगितले. निधीची माहिती मिळाल्यानंतर रुपेश लगेच ऑफीसमधून घरी निघून आला. निधी आणि रुपेशला अकरावर्षांची मुलगी असून, ती सारखी आईबद्दल विचारत आहे. निधी ऑगस्ट १९९६ पासून जेट एअरवेजमध्ये नोकरी करत असून, ती सिनीयर क्रू मेंबर आहे. ब्रसेल्सवरुन जेटचे विमान मुंबईसाठी उड्डाण करणार होते. मात्र त्याआधीच स्फोट झाला.