न्यूयॉर्क - अमेरिकेच्या सुप्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरजवळ असलेल्या मॅनहॅटन बस टर्मिनल येथे स्फोट झाला असून यात अनेक जण जखमी झाले आहेत. टर्मिनलच्या जमिनीखाली पाईपमध्ये बॉम्ब ठेवल्याची शक्यता वर्तवली आहे. स्फोट झालेलं हे ठिकाण गजबजलेले ठिकाण असून येथून 65 दशलक्ष लोक दरवर्षी ये-जा करतात. अमेरिकेमधील हे बस टर्मिनल सर्वात मोठे टर्मिनल आहे. अमेरिकन पोलिसांनी स्फोट झाल्यानंतर एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
मॅनहॅटन बस टर्मिनल येथे 42 व्या रस्त्यावर हा स्फोट झाला. स्फोटचा आवाज होताच लोकांनी पळायला सुरूवात केल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. हा स्फोट झाल्याची माहिती मिळताच अमेरिकन प्रशासनाने बसची उपनगरीय सेवा काही काळासाठी बंद केली आहे.
स्फोट झाल्यानंतर सबवेमध्ये काही लोक अडकले होते परंतु त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. ख्रिसमसला काही दिवस उरले असतानाच झालेल्या या स्फोटामुळे नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेनं अद्याप घेतली नाही. पण हा मोठा दहशतवादी कट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.