ब्रुसेल्स : दहशतवादी हल्ला होण्याची गंभीर शक्यता वर्तविण्यात आल्यानंतर येथील सर्व मेट्रो स्टेशन बंद करण्याची घोषणा सार्वजनिक परिवहन विभागातर्फे करण्यात आली.दहशतवादी हल्ल्याबाबत देण्यात आलेल्या सावधानतेच्या इशाऱ्याची पातळी सर्वोच्च स्तरावर आहे. याचा अर्थ दहशतवादी हल्ला कधीही होऊ शकतो. ब्रुसेल्समध्ये परिवहन संचालक एस.टी.आय.बी.ने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे की, संघीय अंतर्गत सार्वजनिक सेवेच्या आपत्कालीन केंद्राच्या सल्ल्यानंतर खबरदारी म्हणून आज सर्व मेट्रो रेल्वेस्टेशन बंद राहतील. बसेस चालू राहतील. या निर्णयाचा परिणाम काही प्रमाणावर ट्रामवर होईल. संबंधित अधिकारी आणि पोलीस यांच्याशी दैनंदिन विचारविनिमय करून हे स्टेशन पुन्हा कधी उघडली जातील याचा निर्णय घेतला जाईल.गेल्या आठवड्यात पॅरिसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १३० जण मरण पावले होते. या पार्श्वभूमीवर संपूर्ण युरोपातच सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. ब्रुसेल्स येथेही असा हल्ला होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने तेथेही अलर्ट जारी करण्यात आला आहे.राजधानीतील सार्वजनिक कार्यक्रम होणारे हॉल आणि गर्दी असणाऱ्या ठिकाणी लोकांनी जाऊ नये, असे आवाहन सरकारने केले आहे, तसेच आठवड्यात होणारे फुटबॉल सामने आणि अन्य सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याची शिफारस अधिकाऱ्यांनी केली आहे. (वृत्तसंस्था)
बेल्जियममध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता
By admin | Published: November 22, 2015 3:11 AM