ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. १४ - पाठदुखीवर शस्त्रक्रिया टाळून अन्य उपचार करण्याचा तितकासा फायदा होत नाही. पाठदुखीवर शस्त्रक्रिया अधिक प्रभावी ठरते त्यामुळे लैंगिक तुप्तीचा आनंदही वाढतो असे एका संशोधनातून समोर आले आहे. पाठदुखीने त्रस्त असलेल्या बहुतांश रुग्णांना सेक्स लाईफची जास्त चिंता असते असे कॅलिफोर्निया विद्यापीठाचा एक संशोधक शेन बुर्च यांनी सांगितले.
पाठदुखीवर शस्त्रक्रिया करुन घेतली तर वेदना कमी होतातच पण त्याचबरोबर सेक्स लाईफही सुधारते असे संशोधनातून समोर आले आहे. स्पाईन आऊटकम रिसर्च ट्रायलच्या डाटाच्या माहितीचे संशोधकांनी विश्लेषण केले. स्पोर्टच्या अहवालानुसार पाठदुखी आणि सेक्सचा संबंध आहे असे सांगणा-या ८२५ रुग्णांपैकी ५३१ रुग्णांवर छोटया आणि अन्य प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्या.
२९४ जणांवर शस्त्रक्रिया न करता अन्य उपचार करण्यात आले. शस्त्रक्रियेपूर्वी ५५ टक्के रुग्णांची पाठदुखीचा सेक्सवर परिणाम होतो अशी तक्रार होती. शस्त्रक्रियेनंतर २० टक्क्यापेक्षा कमी रुग्णांनी पाठदुखीमुळे सेक्स करताना त्रास होत असल्याचे सांगितले. शस्त्रक्रिया न करणा-या ४० टक्के रुग्णांची पाठदुखी सेक्सवर परिणाम करत होती. त्यामुळे शस्त्रक्रिया करुन घेणा-या रुग्णांच्या पाठदुखीच्या वेदना कमी झाल्या आणि सेक्स तृप्तीमध्ये वाढ झाली. स्पाईन जर्नलमध्ये हा निष्कर्ष प्रसिद्ध झाला आहे.