Asif Ali Zardari : आसिफ अली झरदारी यांची पाकिस्तानचे नवे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तानचे 14 वे राष्ट्रपती म्हणून ते शपथ घेणार आहेत. दोन्ही सभागृहात त्यांना बहुमत मिळाले आणि तीन प्रांतातही प्रचंड बहुमत मिळाले. आसिफ अली झरदारी यांच्या पत्नी आणि पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतर त्यांना जवळपास दशकभर तुरुंगात राहावे लागले होते.
आसिफ अली झरदारी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवले आणि सहज विजय मिळवला. त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आणि देशातील चारपैकी तीन प्रांतांच्या विधानसभेत बहुमत मिळाले. आसिफ अली झरदारी यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार महमूद अचकझाई यांचा 230 मतांनी पराभव केला. आसिफ अली झरदारी यांना 411 मते मिळाली, तर महमूद अचकझाई यांना 118 मते मिळाली.
निवडणुकीचे अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वीच पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला. आसिफ अली झरदारी यांच्या दोन्ही मुलींनी वडिलांच्या विजयाबद्दल पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अभिनंदन केले. भ्रष्टाचार आणि खुनाच्या आरोपाखाली आसिफ अली झरदारी 11 वर्षे तुरुंगात होते, तरीही ते कधीही दोषी आढळले नाहीत. आता त्यांचे राष्ट्रपती होणे, हे त्यांचे राजकारणात पुनरागमन आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला नवसंजीवनी मिळणार आहे.
दुसऱ्यांदा बनले पाकिस्तानचे राष्ट्रपतीआसिफ अली झरदारी दुसऱ्यांदा पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी 2008 ते 2013 दरम्यान त्यांनी पाकिस्तानचे 11 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले ते पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती होते आणि त्यांनी त्यांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर पुढील राष्ट्रपतींना पदभार सोपवला होता. बेनझीर भुट्टो सरकारमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. मात्र, सरकार पडल्यानंतर त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आणि त्यांना अटकही झाली होती.