Prabowo Oath Ceremony: प्रबोवो सुबियांतो यांनी रविवारी (20 ऑक्टोबर 2024) इंडोनेशियाच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. इंडोनेशियन परंपरेनुसार इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराणच्या साक्षीने त्यांनी शपथ घेतली. या शपथविधीनंतर ते जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे राष्ट्रपती बनले आहेत. 73 वर्षीय प्रबोवो इंडोनेशियन लष्कराचे माजी जनरल होते. तसेच, त्यांनी देशाचे संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिले आहे.
निवडणुकीपूर्वी त्यांनी देशातील शालेय मुलांना मोफत जेवण आणि शिक्षणात केलेल्या सुधारणांमुळे ही निवडणूक जिंकली आहे. प्रबोवो यांनी 14 फेब्रुवारी रोजी सुमारे 60 टक्के मतांसह निवडणूक जिंकली आणि गेल्या नऊ महिन्यांत त्यांनी मजबूत संसदीय आघाडी तयार करण्यासाठी काम केले.
कोण आहेत प्रबोवो सुबियांतो?प्रबोवो यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1951 रोजी जकार्ता, इंडोनेशिया येथे झाला. त्यांचा जन्म इंडोनेशियातील सर्वात शक्तिशाली कुटुंबात झाला. त्यांचे वडील सोमिट्रोन जोजाहादिकुमो हे देशातील प्रमुख अर्थशास्त्रज्ञ आणि नेते होते. त्यांनी सुकर्णो आणि सोहार्तो यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात सरकारमधील अनेक महत्त्वाच्या मंत्रिपदांवर काम केले. त्यांची आई मेरी सिरेगर एक गृहिणी होती, परंतु तीदेखील नेदरलँडमधून सर्जिकल नर्सिंगचे शिक्षण घेतल्यानंतर देशात परतली. प्रबोवोचे आजोबा मॅग्रोनो हेदेखील बँक नेगारा इंडोनेशियाचे संस्थापक होते.
राजकीय प्रवास1974 मध्ये प्रबोवो इंडोनेशियन सैन्यात सामील झाले आणि आर्मी जनरलच्या पदापर्यंत पोहोचले. 2008 मध्ये त्यांनी गेरिंद्र पक्षाची स्थापना केली आणि 2014 मध्ये त्याचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. 25 ऑक्टोबर 2023 रोजी प्रबोवो यांनी गेरिंद्राच्या नेतृत्वाखालील ऑनवर्ड इंडोनेशिया युतीकडून राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून नामांकन दाखल केले आणि फेब्रुवारीमध्ये निवडणूक जिंकल्यानंतर रविवारी इंडोनेशियाचे अध्यक्ष झाले.