Nepal new Prime Minister Prachand: नेपाळच्याराजकारणात आजचा दिवस अतिशय नाट्यमय होता. दुपारपर्यंत शेर बहादूर देउबा पंतप्रधान होण्याचा मार्ग स्पष्ट दिसत होता, मात्र CPN-Maoist सेंटरचे अध्यक्ष पुष्प कमल दहल यांनी नाराज होऊन बैठक सोडली आणि युतीपासून वेगळे होण्याची घोषणा केली. त्यानंतर केपी शर्मा ओली यांचा पक्ष CPN-UMLच्या पाठिंब्याने प्रचंड आता नेपाळचेपंतप्रधान झाले आहेत. नेपाळच्या राष्ट्रपतींनी देशाचे नवे पंतप्रधान म्हणून पुष्प कमल दहल (Pushpa Kamal Dahal) यांची नियुक्ती केली आहे. सोमवारी दुपारी ४ वाजता दहल यांना पंतप्रधानपदाची शपथ देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रपती कार्यालयाकडून देण्यात आली आहे. खासदारांच्या पाठिंब्याचे पत्र पुष्प कमल दहल प्रचंड यांनी नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांना सुपूर्द केले. या पत्रावर प्रचंड यांच्या समर्थनार्थ १६५ खासदारांच्या सह्या आहेत.
नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी पंतप्रधानपदासाठी दावा करण्यासाठी सर्व पक्षांना आजपर्यंतची मुदत दिली होती. यानंतरही नेपाळी काँग्रेस आणि केपी शर्मा ओली यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीने दावा केला नाही. त्यामुळेच सरकार स्थापनेची चर्चा योग्य दिशेने होत नसल्याच्या बातम्या येत होत्या. सर्व शक्यतांना पूर्णविराम देत पुष्प कमल दहल यांनी केपी शर्मा ओली यांच्याशी हातमिळवणी केली आणि आता ते नेपाळचे नवे पंतप्रधान झाले आहेत. सोमवारी दुपारी ४ वाजता ते पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष सीपीएन-यूएमएल, सीपीएन-माओवादी केंद्र, राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष आणि इतर लहान पक्षांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत 'प्रचंड' यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यावर सहमती झाली. CPN-Maoist चे सरचिटणीस गुरुंग यांनी सांगितले होते की केपी शर्मा ओली यांचा पक्ष आणि इतर पक्षांसह, १६५ खासदारांच्या स्वाक्षरीने राष्ट्रपती कार्यालयात पुष्प कमल दहल प्रचंड यांना पंतप्रधान बनवण्याचा दावा करण्यास तयार आहेत. त्यानुसार नाट्यमय घडामोडी घडल्या आणि अखेर पंतप्रधान पदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
बैठकीत काय घडलं?
महत्त्वाच्या बैठकीत प्रचंड आणि ओली यांच्यात रोटेशनच्या आधारे सरकारमध्ये आघाडी करण्यासाठी चर्चा झाली आहे. प्रचंड यांच्या मागणीनुसार, ओली यांनी त्यांना पहिली संधी मिळताच पंतप्रधान बनवण्याचे मान्य केले. त्यामुळे स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, प्रचंड २०२५ मध्ये पंतप्रधानपदाचा कार्यभार सोडतील आणि CPN-UML कडे हे पद जाईल.
नेपाळमधील सध्याचे पक्षीय बलाबल
नवीन आघाडीला २७५ सदस्यीय संसदेपैकी १६५ खासदारांचा पाठिंबा आहे. या निवडणुकीत नेपाळी काँग्रेसने २७५ जागांपैकी ८९ जागा जिंकल्या, सीपीएन-यूएमएलला ७८ जागा मिळाल्या आणि CPN-Maoist ला ३२ जागांवर समाधान मानावे लागले. प्रथमच निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षानेही २० जागा जिंकल्या, जनता समाजवादी पक्षाने १२ तर जनमत पक्षाने ६ जागा जिंकल्या.