लंडन : भारतभरातील अभिजनांनी उपस्थित केलेल्या असहिष्णुतेच्या मुद्द्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पिच्छा इंग्लंड वारीतही सोडला नाही. इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आणि नरेंद्र मोदी यांनी एकत्रित घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदी यांच्याकडे भारतात वाढीस लागलेल्या असहिष्णू वातावरणाबाबत विचारणा झालीच. अब्जावधींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार, राणीकडचे प्रीतिभोजन, पंतप्रधानांकडचा मुक्काम, भारतीयांसाठीच्या भाषणासाठीची विलक्षण आतुरता, उत्स्फूर्त तिरंगी स्वागत आणि निदर्शनांचे किंचितसे गालबोट अशा अपूर्व माहोलातही ‘असहिष्णुते’ने गाठल्यावर भारतात असहिष्णुतेला थारा नाही आणि भारत ही भगवान बुद्ध आणि गांधीजींची भूमी असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. भारत सध्या असहिष्णू देश का होत चालला आहे असे विचारताच मोदी म्हणाले, ‘‘भारत ही गौतम बुद्ध आणि महात्मा गांधीजी यांची भूमी आहे, आणि भारतीय संस्कृती मूलभूत सामाजिक तत्त्वांच्या विरोधातील कोणतीही घटना स्वीकारत नाही. एखाददुसऱ्या घटनेबाबतही भारत असहिष्णुता खपवून घेत नाही. १२५ कोटींच्या देशामध्ये ती घटना महत्त्वपूर्ण असो वा नसो, आमच्यासाठी ती गंभीरच आहे.’’ भारतातील कायदा त्याचे काम चोख बजावत असतो आणि यापुढेही करत राहील. भारत लोकशाहीचे एक जिवंत प्रतीक असून, आमची राज्यघटना प्रत्येक नागरिकाच्या जीविताचे आणि विचारांचे रक्षण करते आणि आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी या भेटीत भारत आणि इंग्लंडमधील विविध कंपन्यांच्या सीईओंच्या गोलमेज परिषदेस संबोधित केले. या परिषदेत भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत आश्वासक आणि सातत्याने प्रगती करीत असल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिक बाबतीत भारत आणि इंग्लंड एकमेकांसाठीच बनले आहेत. या आर्थिक नात्याचे मार्गदर्शक खासगी कंपन्यांंचे सीईओच आहेत. याबरोबरच भारतीय रेल्वेची स्थानके पीपीपी मॉडेलद्वारे विकसित करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखविला. कौशल्यविकास हाच माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा असून, सर्व जगाला मनुष्यबळ भारत पुरवू शकेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. (वत्तसंस्था)
लंडनमध्ये पडसाद असहिष्णुतेचे
By admin | Published: November 14, 2015 3:48 AM