चेन्नई - अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीत चांगलीच रंगत भरली असून आज मतदानाला सुरूवात झाली आहे. अमेरिकेच्या निवडणुकीत लाखो भारतीय नागरिकही आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. तसेच, भारतीयांनाही या निवडणुकींत रस असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच, भारतीय नागरिकांकडून अमेरिकेतील निवडणुकींसंदर्भात चर्चा घडत आहेत. आता, तामिळनाडूतील थुलासेंद्रपुरम या गावात उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार कमला हरीस यांचे पोस्टर्स झळकले आहेत. गावकऱ्यांनी बॅनरबाजी करत कमला हॅरीस यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे.
कमला हॅरीस या डेमोक्रेटीक पक्षाच्या उमेदवार असून राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन यांनी उपराष्ट्रपती पदासाठी कमला हॅरीस यांच्या नावाची घोषणा केली आहे. अमेरिकेतील या महत्त्वाच्या पदासाठी निवडणूक लढवणारी पहिली कृष्णवर्गीय महिला म्हणून कमला हॅरीस मैदानात उतरल्या आहेत. कमला हॅरीस यांचं मूळ भारतीय असून भारताशी त्यांचं जवळचं नातं आहे. अमेरिकेच्या दोन्ही प्रमुख पक्षांनी आत्तापर्यंत कुठल्याही कृष्णवर्णीय महिलेस राष्ट्राध्यक्ष पदाचा उमेदवार बनवले नाही. तसेच, आजपर्यंत एकही महिला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली नाही.
कमला या कॅलिफोर्निया येथील खासदार असून यापूर्वी अटर्नी जनरल म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. सध्या कमला हरीस यांना विद्यमान उपराष्ट्रपती माइक पेन्स यांचं आवाहन आहे. कमला हरीस यांनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या सुरक्षा सल्लागारपदाचीही जबाबदारी पार पाडली आहे. हॅरीस या मूळ भारतीय वंशाच्या असून तामिळनाडूतील थुलासेंद्रपुरम गावात त्यांचे पूर्वज आहेत. त्यामुळेच, गावातील लोकांनी त्यांच्या विजयासाठी देवाला नवस करत, गावात बॅनरबाजी केली आहे. आपल्या गावची कन्या अमेरिकेची उपराष्ट्रपती होणार, या आशेने गावकरी आनंदी आहेत. दरम्यान, कमला यांचा जन्म कॅनिफॉर्नियात झाला होता. शामला गोपालन असे त्यांच्या आईचे तर डोनाल्ड हॅरीस असे त्यांच्या वडिलांचे नाव आहे.