लंडन : गर्भावस्थेदरम्यान महिलेला पुन्हा गर्भ राहिल्याची दुर्मिळ घटना ब्रिटनमध्ये घडली असून, गेल्या १०० वर्षांतील अशा प्रकारची ही सहावी घटना आहे. जुळी मुले होणार असताना मला पुन्हा गर्भ राहिला आणि मी एकाचवेळी तीन मुलांना जन्म दिला, असा दावा एका ब्रिटिश महिलेने केला आहे. एखादी महिला गर्भवती झाल्यानंतर एक किंवा आठवड्यांत पुन्हा गर्भवती होण्यास विज्ञानाच्या भाषेत ‘सुपरफोएटेशन’ असे म्हणतात. प्रजोत्पादन विषयाचे तज्ज्ञ प्रोफेसर सायमन फिशेल यांच्या मते, सामान्यपणे असे घडत नाही; मात्र असे घडले आहे हे खरे. अशा प्रकारची पहिली घटना १८६५ मध्ये घडली होती. त्यानंतर गेल्या १०० वर्षांत असे केवळ सहा प्रकार समोर आले आहेत. गर्भावस्थेदरम्यान पुन्हा गर्भ राहण्याचे परिणाम चांगलेच होतील, असे नाही. भ्रूण गर्भातच नष्ट होण्याचे, तसेच मुदतपूर्व प्रसूती करावी लागण्याचे प्रकार घडले आहेत. मानवांत अशा प्रकारच्या चमत्कारिक घटना कधीकधीच घडतात. काही काळापूर्वी रोममध्येही अशीच अनोखी घटना घडली होती. तेथे एक महिला तीन-चार महिन्यांची गर्भवती असताना तिला पुन्हा गर्भ राहिला होता, असे फिशेल म्हणाले.
गर्भावस्थेदरम्यान पुन्हा राहिला गर्भ
By admin | Published: April 26, 2017 12:59 AM