पोर्तुगालमध्ये गर्भवती भारतीय महिलेचा रुग्णालयात जागा न मिळाल्याने मृत्यू झाला. ही घटना समोर येताच येथील आरोग्य मंत्री मार्ता टेमिडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बेड न मिळाल्याने दुसऱ्या रुग्णालयात हलवलाना संबंधित 34 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेल्या राजधानी लिस्बन येथील एका रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, येथे मेटरनिटी वॉर्डमध्ये जागा न मिळाल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येत होते. पण रस्त्यातच हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला.
नैतिकता म्हणून दिला राजीनामा -पोर्तुगालच्या रुग्णालयांमध्ये कर्मचारी आणि डॉक्टरांच्या कमतरतेमुळे, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. डॉ. मार्ता टेमिडो 2018 पासून आरोग्य मंत्री होत्या. कोरोनाच्या काळात उत्तररित्या परिस्थिती हाताळल्याबद्दल त्यांचे खूप कौतुकही झाले आहे. यासंदर्भात बोलताना सरकारने मंगळवारी सांगितले, की अशा परिस्थितीत पदावर राहिले जाऊ शकत नाही, हे डॉ. टेमिडो यांच्या लक्षात आले आहे. संबंधित महिलेच्या मृत्यूमुळे डॉ. टेमिडो अत्यंत व्यथित झाल्या आहेत. यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
बाळाला वाचवण्यात यश - स्थानिक माध्यमांतील वृत्तानुसार, भारतीय महिलेला लिस्बनमधील सांता मारिया रुग्णालयातून हलवण्यात येत होते. राजधानी लिस्बनमधील हे सर्वात मोठे रुग्णालय आहे. महिलेला वाचवता आले नाही. पण तत्काळ शस्त्रक्रिया करून बाळाला वाचवण्यात यश आले आहे. महिलेचे बाळ स्वस्थ असल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.