वॉशिंग्टन : लहान मुलांचे कपडे खरेदी करण्यास गेलेल्या गर्भवती महिलेवर चाकूने हल्ला करून तिच्या गर्भातील अर्भक काढून घेतल्याची घटना अमेरिकेत घडली. पीडिता बाळाचे कपडे घेण्यासाठी ज्या महिलेकडे गेली होती तिनेच हा हल्ला केला. या माथेफिरू महिलेला गजाआड करण्यात आले असून ती मनोरुग्ण असल्याचा संशय आहे. कोलोरॅडो प्रांतातील लाँगमाँट येथे घडलेल्या या भयंकर घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी महिलेने तिच्याकडे लहान मुलांचे कपडे मिळतील, अशी जाहिरात आॅनलाईन दिली होती. ही जाहिरात पाहून सात महिन्यांची गर्भवती महिला (२६) जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर म्हणजे लॉंगमॉंट येथे पोहोचली. मात्र, तेथे तिच्या पुढ्यात भलतेच वाढून ठेवले होते. गर्भवती महिला पोहोचताच माथेफिरू महिलेने तिला मारहाण करत चाकूने भोसकले व तिच्या गर्भपिशवीतून बाळ काढून घेतले. महिलेच्या किंचाळ्या ऐकू येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. तेव्हा तेथे थरकाप उडविणारी परिस्थिती होेती. पीडित महिला जखमी अवस्थेत विव्हळत होती. तिच्या पोटातील बाळ बेपत्ता होते. पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथे तातडीने शस्त्रक्रिया केली. तिचे प्राण धोक्याबाहेर असले तरी अर्भक मात्र वाचू शकले नाही. संशयित हल्लेखोर महिला या अर्भकास घेऊन रुग्णालयात आली व अकाली प्रसूती झाल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी पीडित महिला व आरोपी महिलेचे नाव उघड केले नाही; मात्र त्या दोघी एकमेकींना ओळखत नसल्याचे सांगितले. संशयित महिला मनोरुग्ण असावी, असा संशय असल्याचे पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)अर्भक गमावलेल्या मातेसाठी ही एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे. ती मुलासाठी सुंदर कपडे खरेदी करण्यासाठी आली होती आणि तिच्यावर हल्ला होऊन तिच्या पोटातील बाळ काढून घेतले गेले. ही खरेच अत्यंत दुर्दैवी घटना आहे, असे लाँगमॉंट पोलीस कमांडर जेफ्फ सातूर यांनी सांगितले.
गर्भवती महिलेला भोसकून पोटातील बाळ काढून घेतले
By admin | Published: March 20, 2015 11:47 PM