ऑनलाइन लोकमत -
वॉशिंग्टन, दि. 17 - अपघातात मृत्युमूखी पडलेल्या गर्भवती महिलेच्या बाळाला डॉक्टरांनी यशस्वीरित्या वाचवलं आहे. साराह या महिलेला रुग्णलायत नेत असताना गाडीचा अपघात झाला ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करुन आश्चर्यकारकरित्या बाळाला वाचवलं आहे.
साराह आपल्या पती मॅट रायडरसोबत कारने रुग्णालयात चालली होती. त्यावेळी ट्रेलरला धडकून कारचा अपघात झाला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी साहारला आणि तिच्या पोटातील बाळाला वाचवण्यासाठी तात्काळ रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापुर्वीच साराहचा मृत्यू झाला होता. त्यानंतर डॉक्टरांनी अजिबात वेळ न दवडता ऑपरेशन करुन बाळाला वाचवलं.
या बाळाचं वजन 4 पाऊंड भरलं आहे. बाळाला व्हेटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. बाळाने जेव्हा डोळे उघडले तेव्हा नर्सचं बोट पकडल होतं. बाळाच्या मेंदूला काही इजा झाली आहे का ? याची पाहणी करत आहोत, कारण साराहच्या मृत्यूनंतर ऑक्सिजनची कमतरता जाणवली असल्याची शक्यता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. नेमक त्यानंतरच बाळाची तब्बेत कशी आहे कळू शकेल.
मॅट रायडरदेखील गंभीर जखमी झाले असून तब्बेतीत सुधारणा होत आहे. साराहसमोर संपुर्ण आयुष्य होतं. तिच्या बाळाला आता आईशिवाय जगावं लागेल अशी भावना साराहची आई पॅट्रीका यांनी व्यक्त केली आहे.