इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. विरोधकांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यामुळे खान सरकार अडचणीत आलं. सरकारमधील मित्रपक्ष विरोधकांच्या आघाडीत गेल्यानं खान यांचं सरकार पडणार अशी दाट शक्यता निर्माण झाली. मात्र खान यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. संसदेच्या उपसभापतींनी अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावला. विरोधकांनी मांडलेला प्रस्ताव घटनाबाह्य असल्याचं उपसभापती कासीम खान सुरी म्हणाले. त्यामुळे खान सरकार थोडक्यात बचावलं.
सरकार वाचवण्यासाठी इम्रान खान काय करणार याकडे जगाचं लक्ष लागलं होतं. खान यांचा प्लॅन बी त्यांचे मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी वापरला. 'अविश्वास प्रस्ताव लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे. संविधानाच्या ९५ व्या कलमानुसार अविश्वास प्रस्काव मांडण्यात आला. मात्र दुर्दैवानं त्याचा वापर परदेशातील सरकारकडून सत्ता परिवर्तनासाठी होत आहे,' असं हुसेन म्हणाले. त्यानंतर सभागृहाच्या उपसभापतींनी प्रस्ताव फेटाळून लावला.
अविश्वास प्रस्तावामागे परकीय षडयंत्र असल्याचं म्हणत कासीम खान सुरी विरोधकांनी आणलेला प्रस्ताव फेटाळून लावला. त्यानंतर त्यांनी सभागृहाचं कामकाज स्थगित केलं. आता संसदेचं कामकाज २५ एप्रिलला होईल.
या घटनाक्रमानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी सर्व विधानसभा बरखास्त करण्याचं आवाहन राष्ट्रपतींकडे केलं आहे. देशात निवडणुका व्हाव्यात आणि लोकांनी सरकार निवडावं. बाहेरुन होणारी कटकारस्थानं आणि काही भ्रष्ट लोक या देशाचं भवितव्य ठरवू शकत नाही. त्यामुळे जनतेनं निवडणुकीसाठी तयार राहावं. देशाविरोधातलं षडयंत्र आज हाणून पाडण्यात आलं असल्याचं खान म्हणाले.