विलमिंगटन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचा ऐतिहासिक दौरा करून दिलेल्या शांततेच्या संदेशाबद्दल अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी प्रशंसा केली. बायडेन-मोदी यांच्यात शनिवारी द्विपक्षीय चर्चेत युद्धग्रस्त युक्रेनमधील परिस्थितीसह यामुळे निर्माण होत असलेल्या जागतिक आव्हानांवर चर्चा झाली. त्याचवेळी 'क्वाड' परिषदेला जाण्यापूर्वी बायडेन यांनी मोदी यांच्या खांद्यावर हात ठेवत, 'क्वाड' कायम राहणार, असा स्पष्ट संदेश जगाला दिला.
जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जागतिक व्यासपीठावर भारताची असलेली महत्त्वाची भूमिका मान्य केली. विशेषतः जी-२० आणि ग्लोबल साउथ गटात मोदींनी स्वीकारलेले नेतृत्व तसेच इंडो-पॅसिफिक भागात शांतता आणि समृद्धीच्या दृष्टीने 'क्वाड' संघटन अधिक भक्कम करण्यावर मोदींचा असलेला भर या बाबी बायडेन यांना प्रभावित करणाऱ्या ठरल्या. तसेच पश्चिम आशियामध्ये महत्त्वाच्या सागरी मार्गावरील सुरक्षिततेच्या मुद्द्याला दोन्ही नेत्यांनी पाठिंबा.
सुरक्षा परिषद सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा
संयुक्त निवेदनानुसार, भारताने मांडलेल्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर अमेरिकेने पाठिंबा दिलेला आहे. विशेषतः जागतिक स्तरावरील संस्थांमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळावे म्हणून भारताच्या प्रयत्नांचा समावेश आहे.