कॅटलिन नोवाक. हंगेरीच्या राष्ट्राध्यक्ष. तरुण तडफदार नेत्या. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय तरुण वयात त्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष झाल्या. एवढंच नाही, देशाच्या त्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष. इतक्या कमी वयात म्हणजे वयाच्या ४४ व्या वर्षी देशाच्या राष्ट्राध्यक्ष बनणाऱ्याही त्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष. १० मे २०२२ रोजी त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. राष्ट्राध्यक्ष बनण्याच्या आधीही कुटुंब कल्याण मंत्री म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली होती. राष्ट्राध्यक्ष बनल्यावरही त्यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेतले. पंतप्रधान व्हिक्टर ओर्बान यांच्या त्या निकटच्या मानल्या जातात. असं असूनही राष्ट्राध्यक्ष कॅटलिन नोवाक यांना तातडीनं त्यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
पण असं कारण तरी काय घडलं, ज्यामुळे नोवाक यांना इतक्या तडकाफडकी राजीनामा द्यावा लागला? केवळ हंगेरीच नव्हे, तर इतरही अनेक देशांत बाल लैंगिक शोषणाच्या संदर्भात काही आरोप असलेल्या लोकांकडे कमीपणानं पाहिलं जातं. अशा प्रकारच्या गुन्ह्यात अडकलेल्यांना आपल्या पदावरही राहता येत नाही किंवा त्यांना आपलं पद सोडावं लागतं. अर्थात अशा प्रकारच्या गुन्ह्यात नोवाक प्रत्यक्षपणे अडकलेल्या नसल्या, तरी त्याचे शिंतोडे त्यांच्यावर उडालेच आणि त्यांच्याकडे पाहण्याची लोकांची नजरही बदलली. त्यामुळे त्यांना जनतेची माफी तर मागावी लागलीच, पण आपल्या पदावरून पायउतारही व्हावं लागलं.
बाल लैंगिक शोषण प्रकरणात अडकलेल्या एका व्यक्तीला माफी दिल्याबद्दल त्यांना राजीनामा द्यावा लागला. नोवाक यांनी आपल्या अधिकारात ज्या व्यक्तीची शिक्षेतून सुटका केली तो एका बालगृहात उपसंचालक पदावर काम करीत होता. बालगृहात असलेल्या मुलांचं त्यानं लैंगिक शोषण केलं होतं. पण तरीही त्यानं आपल्या बॉसला वाचवायचा प्रयत्न केला होता. अशा व्यक्तीला माफी दिल्यामुळे संपूर्ण हंगेरीमध्ये जनक्षोभ उसळला. लहान मुलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तीलाही तुम्ही माफ करता, म्हणजे अशा प्रकाराला तुमचा पाठिंबा आहे का, असा जाहीर सवाल जनतेनं त्यांना विचारला. आपल्या कृत्याचा तातडीनं जाब द्या, म्हणून त्यांना धारेवरही धरलं. विरोधकांनी तर हा प्रश्न खूपच लावून धरला आणि त्यांच्या नैतिकतेवरही प्रश्नचिन्ह उभं केलं. जनतेसह विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. एवढंच नाही, पंतप्रधान व्हिक्टर ओर्बान यांनी या साऱ्या प्रकरणाची जबाबदारी घ्यावी म्हणून त्यांच्याही मागे लकडा लावला.
मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात पोप फ्रान्सिस बुडापेस्टच्या दौऱ्यावर असताना हा निर्णय घेण्यात आला होता. गेल्याच आठवड्यात स्वतंत्र न्यूज साइट ४४४ ने याबाबतचा खुलासा केल्यानंतर देशातील विरोधक आणि जनतेकडून नोवाक यांच्या राजीनाम्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. नोवाक यांच्या राजीनाम्याच्या मागणीनं हंगेरीत जोर धरला, त्यावेळी त्या कतारच्या दौऱ्यावर होत्या. जागतिक वॉटरपोलो स्पर्धेत हंगेरी आणि कझाकस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याला उपस्थित राहून आपल्या देशाला प्रोत्साहन देण्यासाठी त्या कतार येथे आलेल्या होत्या. पण, देशात सुरू झालेली निदर्शनं पाहून त्या तातडीनं मायदेशी परतल्या. बुडापेस्टच्या विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी तडक आपला राजीनामा दिला.
राष्ट्रीय टेलिव्हिजन चॅनल एम १ वरून बोलताना त्या म्हणाल्या, हंगेरीच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून मी आज शेवटचेच जनतेला संबोधित करते आहे. माझ्या राष्ट्राध्यक्षपदाचा मी राजीनामा देत आहे. या भाषणात ४६ वर्षीय नोवाक यांनी बाललैंगिक शोषणात गुन्हेगार असलेल्या व्यक्तीला माफ करून मी मोठी चूक केली, हेही मान्य केलं. त्या म्हणाल्या, त्या सर्वांची मी मनापासून माफी मागते, ज्यांना मी दुखावले आहे. माझ्या कृतीमुळे ज्या पीडितांचा असा समज झाला की मी त्यांच्या पाठीशी उभी न राहता, गुन्हेगारांना माझा पाठिंबा आहे, त्या साऱ्यांचीही मी माफी मागते. मात्र, या प्रसंगी मी ग्वाही देऊ इच्छिते की मी कायमच मुलांच्या आणि कुटुंबांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध होते, आहे आणि पुढेही राहीन. कोणावरही अन्याय होणार नाही, असाच माझा कायम प्रयत्न होता; पण या प्रकरणात मात्र गुन्हेगाराला माफी देऊन माझ्याकडून चूक झाली. त्या चुकीचं प्रायश्चित्त मी घेते आहे.
न्यायमंत्र्यांचाही राजीनामाकॅटलिन नोवाक यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही मिनिटांतच न्यायमंत्री जुडिट वर्गा यांनीही राजीनामा दिला. नोवाक यांनी गुन्हेगाराला माफी दिली, त्यावेळी वर्गा हंगेरीच्या न्यायमंत्री होत्या. त्या म्हणाल्या, राष्ट्राध्यक्षांच्या निर्णयावर प्रतिस्वाक्षरी करण्याची राजकीय जबाबदारी मी स्वीकारते. मी राजीनामा देत असून, आजपासून सार्वजनिक जीवनातून मी दूर होते आहे. वर्गा यांच्याप्रमाणेच लगेचच राष्ट्राध्यक्षांच्या तीन सल्लागारांनीही तातडीनं राजीनामा दिला. आपल्या कृत्याची ‘जबाबदारी’ त्यांनी स्वीकारली.