बायडेन थेट युक्रेन युद्धभूमीत! रशियाला अंधारात ठेवले; जेलेन्स्कींची घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 10:56 AM2023-02-21T10:56:32+5:302023-02-21T10:57:02+5:30
सोमवारी युक्रेनच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजता कीव्ह शहरातील भोंगे अचानक अधिक जोरात वाजू लागले
कीव्ह : युक्रेनच्या युद्धाला येत्या २४ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण होणार असून, त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला सोमवारी अचानक भेट दिली व सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. युक्रेनच्या पाठीशी अमेरिका भक्कमपणे उभी आहे, हे बायडेन यांनी आपल्या युक्रेन दौऱ्यातून रशियाला दाखवून दिले. बायडेन यांच्या भेटीबद्दल विलक्षण गुप्तता पाळण्यात आली होती.
सोमवारी युक्रेनच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजता कीव्ह शहरातील भोंगे अचानक अधिक जोरात वाजू लागले. हवाई हल्ला होण्याची शक्यता असेल तर अशा पद्धतीचे भोंगे वाजविले जातात, हे आता तेथील नागरिकांच्या सवयीचे झाले आहे; पण सोमवारी कीव्हमधील सर्व प्रमुख रस्ते नागरिकांसाठी बंद करण्यात आले होते.
युक्रेन ताठ मानेने उभा आहे
रशियाने एक वर्षापूर्वी आक्रमण केल्यानंतर काही काळ धास्तावलेले कीव्ह आता पुन्हा खंबीरपणे उभे ठाकले आहे. युक्रेन व तेथील लोकशाही ताठ मानेने उभी आहे व आपल्यावर आक्रमण करणाऱ्यांचा समर्थपणे मुकाबला करत आहे. अमेरिका ही नेहमीच युक्रेनच्या बाजूने उभी राहील. युक्रेनला ५० कोटी डॉलरची अतिरिक्त मदत देण्यात येईल.- जो बायडेन, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका
पोलंडमधून ट्रेनने गेले युक्रेनला...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन वॉशिंग्टनमधून स्थानिक वेळेनुसार रविवारी पहाटे सव्वाचार वाजता एअर फोर्स वन या विमानाने युक्रेनला यायला निघाले. वाटेत ते जर्मनीच्या रॅमस्टिन हवाई तळावर काही वेळ थांबले. त्यानंतर त्यांचे विमान पोलंडमध्ये दाखल झाले. nसोमवारी पोलंडच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी सात वाजता ते वॉर्सा रेल्वे स्थानकावर पोहोचले. तिथून त्यांनी ट्रेनने युक्रेनपर्यंतचा एक तासाचा प्रवास केला. त्यानंतर ते कीव्हमध्ये जेलेन्स्की यांना भेटले.
लोकांमध्ये आश्चर्य
काहीतरी विशेष घडणार असल्याचा नागरिकांना अंदाज आला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांना भेटण्यासाठी कीव्हमध्ये आल्याचे कळताच लोक आश्चर्यचकित झाले. कीव्हमधील ऐतिहासिक चर्च रोडवर कोणालाही प्रवेश देण्यात येत नव्हता. बायडेन युक्रेनमध्ये सुमारे पाच तास होते.
कोणालाही न सांगता युद्धक्षेत्रात गेलेले अमेरिका अध्यक्ष...
२००३ तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश ख्रिसमसच्या आठवड्यात इराकला पोहोचले. बुश यांना त्यांच्या सुरक्षा युनिटने परवानगी दिली नसतानाही ते तिथे पोहोचले.२०१०तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा अफगाणिस्तानची राजधानी काबूलला पोहोचले. येथे त्यांनी अमेरिकन सैनिकांची भेट घेतली आणि त्यांना भेटवस्तू दिल्या.