Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होत आहे. अजूनही रशिया युक्रेनवर विविध पद्धतीने हल्ले करत आहे, तर युक्रेनही पराभव स्विकारायला तयार नाही. या दरम्यान, अचानक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन युक्रेनची राजधानी कीवमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली. यापूर्वीही दोन्ही नेत्यांमध्ये बैठका झाल्या आहेत, परंतु राष्ट्राध्यक्ष बायडेन युक्रेनमध्ये जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा हा अचानक दौरा अनेक चर्चांना तोंड फोडणारा आहे. कारण या भेटीबाबत यापूर्वी कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आले नव्हते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पोलंडला जाणार होते, यादरम्यान त्यांच्या कार्यक्रमात मोठा बदल करण्यात आला आणि ते पोलंडवरुन ट्रेनने कीवला पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या एक वर्षापासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान अमेरिकेच्या बाजूने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. बायडेन कीवमध्ये पोहोचल्याने युक्रेनला नव्याने मोठी मदत मिळण्याची आशा आहे. बायडेन यांनी यापूर्वीच युक्रेनला असलेला पाठिंबा कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. झेलेन्स्की यांनीही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या भेटीवर आनंद व्यक्त केला आहे.
आपल्या भेटीदरम्यान, बायडेन यांनी युक्रेन-रशिया युद्धात शहीद झालेल्या युक्रेनियन सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. याशिवाय त्यांनी युक्रेनला मदत करण्यासाठी 500 दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. झेलेन्स्की यांनी एक निवेदन जारी करून म्हटले की, बायडेन यांचा युक्रेन दौरा हा देशाला त्यांच्या पाठिंब्याचा अत्यंत महत्त्वाचा संकेत आहे. अमेरिकेच्या बाजूनेही सविस्तर निवेदन जारी करण्यात आले आहे. त्या निवेदनात रशियाशी युद्ध सुरू असताना अमेरिका युक्रेनला कशी आणि कोणत्या स्तरावर मदत करणार आहे, असे सांगण्यात आले आहे.
अध्यक्ष जो बायडेन यांनी पुढे म्हटले की, वर्षभरापूर्वी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना वाटत होते की ते युक्रेनला सहज पराभूत करतील. पाश्चात्य देश एक नाहीत, त्यामुळे त्यांना कोणत्याही आव्हानाला सामोरे जावे लागणार नाही. पण ते पूर्णपणे चुकीचे सिद्ध झाले. निवेदनात, बायडेन यांनी असेही सांगितले आहे की, ते युक्रेनला मदत करण्यासाठी आणखी अनेक घोषणा करणार आहेत. यामध्ये शस्त्रास्त्रांपासून ते इतर आवश्यक संसाधनांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. या युद्धात रशियाला मागून मदत करणाऱ्या सर्व देशांना त्यांच्या वतीने इशाराही देण्यात आला आहे.