Russia-Ukraine war: अमेरिकेनं जंग जंग पछाडले पण भारत कणखर! रशिया-युक्रेन मुद्द्यावर बायडन आता जपानमध्ये मोदींशी बोलणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 01:47 PM2022-04-29T13:47:54+5:302022-04-29T13:54:57+5:30
रशिया-युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावरुन अमेरिकेनं भारताला आपल्या बाजूनं उभं करण्यासाठी जंग जंग पछाडले. तरीही भारतानं आपली तटस्थ भूमिका कायम ठेवली आहे.
रशिया-युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावरुन अमेरिकेनं भारताला आपल्या बाजूनं उभं करण्यासाठी जंग जंग पछाडले. तरीही भारतानं आपली तटस्थ भूमिका कायम ठेवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन पुढील महिन्यात जपानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मे महिन्यात जपानमध्ये होणाऱ्या क्वाड समिटच्या निमित्ताने बायडन-मोदी यांची भेट होणार आहे. भारतावर दबाव वाढवण्यासाठी अमेरिका क्वाड बैठकीच्या अजेंड्यामध्ये रशिया-युक्रेन युद्धाचा मुद्दाही उपस्थित करणार आहे. यामध्ये जपान आणि ऑस्ट्रेलियाचाही पाठिंबा मिळत आहे, तर भारताला क्वाड बैठकीत युद्धाचा मुद्दा उपस्थित होऊ द्यायचा नाहीय.
क्वॉड कमिटीमध्ये मोदी-बायडन भेटणार
ज्यो बायडन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टोकियोमध्ये भेट घेणार असल्याच्या वृत्ताला व्हाइट हाऊसकडूनही दुजोरा देण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष २० ते २४ मे दरम्यान दक्षिण आफ्रिका आणि जपानला दौऱ्यावर जाणार आहेत. जपानमध्ये क्वाड शिखर परिषदेत सहभागी होताना ते कोरियासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. क्वाडमध्ये अमेरिकेसोबतच भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितले की, "या भेटीमुळे बायडन-हॅरिस प्रशासनाची मुक्त आणि इंडो-पॅसिफिकसाठी दृढ वचनबद्धता निर्माण होईल."
भारताच्या खंबीर आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरणामुळे अमेरिकेची चिंता वाढली
बायडन यांनी अनेकदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. या महिन्यात ११ एप्रिल रोजी दोन्ही नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली होती. त्यातही रशियाबाबतच्या भारताच्या भूमिकेबाबत पंतप्रधान मोदींची मत परिवर्तन करण्यात बायडन यांना यश आलं नव्हतं. 11 एप्रिलची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक असो किंवा ऑस्ट्रेलियात झालेली शेवटची क्वाड बैठक असो, रशिया-युक्रेन युद्धाबाबत दोन्ही मतभेद राहिले आहेत. अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाने क्वॉडच्या अजेंड्यावर रशिया-युक्रेनचा मुद्दा समाविष्ट केला आणि भारताने त्यास विरोध केला आहे. तसंच अमेरिकेच्या मार्गानं जाण्यास नकार दिला होता.
भारतावर कठोर कारवाई करणं का टाळतेय अमेरिका?
भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर मिळाल्यानंतरही, बायडन प्रशासनाने दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून नवी भारताबाबत मवाळ भूमिका ठेवली आहे. कारण त्यांच्या मनात चीनचा धोका आहे, त्यामुळे अमेरिका भारताबाबत कठोर निर्णय घेणं टाळत आहे. सिनेटर विल्यम हॅगर्टी यांनी अमेरिका-भारत मतभेदांबद्दल निराशा व्यक्त केली. त्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी त्यांच्या खासदाराला शांत केले होतं.
'मी जे पाहतोय ते खूपच निराशाजनक आहे... कालांतराने 21 व्या शतकात आमची धोरणात्मक भागीदारी अधिक घट्ट होईल", असं विल्यम हॅगर्टी म्हणाले होते. यावर ब्लिंकेन म्हणाले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक भागीदारी वाढत आहे आणि ती सर्वात महत्त्वाची पायाभूत भागीदारी बनण्याची क्षमता आहे. यामागे चीन हे एक मोठे कारण असल्याचं ते म्हणाले.
"आम्ही क्वाड तयार केला आहे ज्यामध्ये आम्ही ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेसह भारताला आणले आहे. भारतासोबत सर्व आघाड्यांवर सहकार्य करण्यासाठी हे एक मोठं व्यासपीठ बनलं आहे", असं मंत्री ब्लिंकन म्हणाले.
भारताला रशियापासून दूर करण्याची अमेरिकेची आशा कायम
अमेरिकेला रशियाच्या मुद्द्याची चिंता आहे. रशिया-युक्रेन युद्ध हा क्वाड बैठकीच्या अजेंड्यापासून दूर ठेवावा, असा भारताचा आग्रह आहे, पण अमेरिकेला ते मान्य नाही. रशिया-युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर चर्चेला जपान आणि ऑस्ट्रेलियाचाही पाठिंबा आहे. भारताने रशियापासून दूर राहण्यास नकार दिल्यानंतर अमेरिका आता भारत-रशिया संबंध कसे खराब होतील याकडे लक्ष देत असल्याचे ब्लिंकन यांनी संकेत दिले होते. "भारताबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याशी असलेले संबंध अनेक दशकांपासूनचे आहेत आणि भारताने रशियाशी गरजेपोटी भागीदारी केली होती कारण तेव्हा आम्ही भागीदार होण्याच्या स्थितीत नव्हतो", असं ब्लिंकन यांनी म्हटलं होतं. भारत आपल्या संरक्षण गरजांसाठी रशियावर अवलंबून होता, परंतु आता ज्या प्रकारे अमेरिकेशी संबंध दृढ झाले आहेत त्यामुळे अमेरिका आता अशास्थितीत आहे की भारताचे रशियावरील अवलंबित्व संपुष्टात आणू शकतो असा ब्लिंकन यांच्या बोलण्याचा उद्देश होता. अशा प्रकारे अमेरिका आज भारत-रशिया संबंध कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे.