नवी दिल्ली - जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनाने शाही घराण्यांना देखील सोडले नाही. स्पेनच्या राजकुमारीचा देखील कोरोनाने जीव घेतला आहे. आता कोरोनाच्या सावटाखाली थेट रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आले आहे. पुतीन यांनी ज्या डॉक्टरशी हात मिळवला, त्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
पुतीन यांनी ज्या डॉक्टरांशी हात मिळवला ते डॉक्टर मॉस्को येथील कोरोना रुग्णालयाचे प्रमुख आहेत. या रुग्णालयाला पुतीन यांनी भेट दिली होती. आता त्या डॉक्टरांनाच कोलोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने पुतीन यांच्या कार्यालयाकडून त्यांच्या तब्येतीविषयी माहिती देण्यात आली. पुतीन यांचे आरोग्य उत्तम असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात मंगळवारी पुतीन यांनी डॉक्टर डेनिस प्रोत्सेनको यांची रुग्णालयात जावून भेट घेतली होती. यावेळी डॉक्टरांनी सुरक्षाकोट परिधान केला होता. मात्र काही वेळाने पुतीन आणि डॉक्टर हात मिळवताना दिसून आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी सुरक्षाकवच परिधान केलेले नव्हते.
दरम्यान पुतीन यांच्या कार्यालयाचे प्रवक्ते देमित्री पेस्कोव यांनी माध्यमांना सांगितले की, पुतीन यांची नियमीत अंतराने तपासणी सुरू आहे. त्यांच्या प्रकृतीची काळजी करण्याचे कारण नाही. सर्वकाही ठीक आहे. रशियात आतापर्यंत २३३७ लोकांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.